Fri, Dec 13, 2019 16:45होमपेज › Sports › संघसहकाऱ्याला लाथा घालणारा बांगलादेशी फास्ट बॉलर निलंबित 

संघसहकाऱ्याला लाथा घालणारा बांगलादेशी फास्ट बॉलर निलंबित 

Last Updated: Nov 18 2019 7:51PM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

बांगला देश क्रिकेट बोर्डाने बांगलादेशचे फास्ट बॉलर शहादत हुसैन याला बीसीबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त एका क्रीडा वेबसाईटने दिले आहे. शहादत हुसैनची निलंबित होण्याची ही पहिली घटना नाही. २०१५ लाही त्याला ११ वर्षाच्या घरकाम करणाऱ्या मुलाचा छळ केल्याप्रकरणी जेलमध्ये जावे लागले होते. त्यानंतर बीसीबीने त्याच्यावर सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. 

बांगला देशमध्ये सुरु असलेल्या ढाका विभागाच्या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत शहादत खेळत होता. त्यावेळी त्याने आपला संघसहकारी अराफात सुन्नीवर हल्ला केला होता. त्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने गुन्हा केल्याचे कबुलही केले आणि प्रस्तावित एका वर्षाच्या बंदीलाही सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. बीसीबी अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार लेवल चार गुन्ह्याला बीसीबी नियमांनुसार खेळाडूला बीसीबीच्या कोणत्याही स्पर्धेत १ वर्ष सहभागी होता येत नाही तसेच त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येतो. 

दरम्यान, सामना अधिकारी अख्तर अहमद यांनी याबाबतचा रिपोर्ट बीसीबीला सादर केला आहे. याबाबत लेवल ४ च्या गुन्ह्याबाबत शिक्षा करण्याचा अधिकार सामना अधिकाऱ्यांना नाही असेही त्यांनी सांगितले. सामनाधिकारी पुढे म्हणाले 'हा मोठा गुन्हा आहे कारण यात वेडेवाकडे हावभाव किंवा अपमानजनक भाष्य नाही तर त्याने संघसहकाऱ्याला लाथा घातल्या आहेत. त्यामुळे याचा अहवाल बीसीबीला पाठवला आहे. पुराव्यांची पडताळणी करुन बोर्ड कोणती शिक्षा द्यायची हे ठरवेल.'

शहादत हुसैनने २००५ ला इंग्लंड दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले होते. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध २०१३ ला खेळला होता.