होमपेज › Sports › #INDvAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय, मालिकेत बरोबरी

#INDvAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय, मालिकेत बरोबरी

Last Updated: Jan 17 2020 10:00PM
 

 

राजकोट : पुढारी ऑनलाईन

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताने प्रथम फलंदजी करत ठवेवले 341 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही त्यांचा संपूर्ण संघ 49.1 षटकात 304 धावात बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 98 धावांची झुंजार खेळी केली त्याला मार्नस लॅबुश्चग्नेने 46 धावांची खेळी करुन साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाच्या प्रभावी माऱ्यापुढे इतर फलंदाजांनी नांगी टाकली. शमीने 3 तर जडेजा, कुलदीप आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शिखर धवनने 96,  विराटने 78  तर लोकेश राहुलेने धडाकेबाज फलंदाजी करत 80 धावा केल्या त्यामुळे भारत 340 धावा करु शकला.  मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी बेंगळुरु येथे होणार आहे. 

भारताने ठेवलेल्या 341 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला 15 धावांवर शमीने  मनिष पांडे करवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या स्मिथ आणि कर्णधार अॅरोन फिंच यांनी दुसऱ्या विकेट 62 धावांची भागिदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जडेजाने 33 धावांवर खेळणाऱ्या फिंचला यष्टीचीत करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. 

वाचा : रोहित सर्वात वेगवान 7 हजारी मनसबदार, तर राहुलही हजारी मनसबदीरीत 

पण, त्यानंतर आलेल्या मार्नस लॅबुश्चग्ने आणि स्मिथने भारतीय गोलंदाजांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. स्मिथने दमदार अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला 150 च्या पार पोहचवले. दरम्यान, आपला दुसरा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या लॅबुश्चग्नेही आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागिदारी रचली. त्यामुळे सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकले असे वाटत होते. पण, लॅबुश्चग्नेला जडेजाचा चेंडू सीमापार पोहचवण्याचा मोह आवरला नाही आणि आपल्या पहिल्या अर्धशतकासाठी 4 धावांची गरज असताना तो 46 धावांवर शमीकेडे सोपा झेल देत बाद झाला. 

लॅबुश्चग्ने बाद झाल्यानंतर स्मिथने डावाची सगळी सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आपल्या शतकाकडे कूच केली पण, त्याला साथ देणारा अॅलेक्स कॅरी 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुलदीपने स्मिथचाही त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला. स्मिथ 98 धावांवर बाद झाल्यामुळे त्याचे झुंजार शतक 2 धावांनी हुकले. स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. मनोबल वाढलेल्या भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांनी फक्त हजेरी लावली. केन रिचर्डसनच्या नाबाद 24 धावा सोडल्या तर तळातील इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रिचर्डसनमुळेच ऑस्ट्रेलिया 304 धावांपर्यंत मजल मारु शकली. 

तत्पूर्वी,  राजकोट येथे सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शिखर धवनच्या 96, लोकेश राहुलच्या वेगवान 80 आणि विराट कोहलीच्या 78 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर  341 धावांचे आव्हान ठेवले. भारताने 50 षटकात 6 बाद 340 धावा केल्या.  विराट, शिखर आणि राहुल यांच्याबरोबच सलामीला रोहित शर्माने 42 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीतील श्रेयस अय्यर (7) आणि मनिष पांडेने (2) निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 10 षटकात 50 धावा देत 3 विकेट काढल्या तर केन रिचर्डसनने 2 विकेट काढून त्याला चांगली साथ दिली. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पिहिल्या सामन्यात भारताला चांगली सलामी देण्यात अपयश आले होते. पण, राजकोट वरील आजच्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्माने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. त्यांनी पहिल्या 10 षटकात जवळपास 6 धावा प्रती षटक या सरासरीने धावा केल्या. रोहितने 10 षटकानंतर धावगती वाढवण्यासाठी आक्रमक खेळण्यास सुरुवात केली पण, झाम्पाला स्विप मारण्याच्या नादात तो 42 धावांवर पायचीत झाला. 

वाचा : विराटने पहिल्या सामन्यातील चूक सुधारली

त्यानंतर कर्णधार विराटने पहिल्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर लोकेश राहुलला न पाठवता स्वतः फलंदाजीला आला. त्याने रोहित आणि शिखर यांनी सेट केलेली धावगती कायम राखत 18 व्या षटकात भारताचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर शिखर धवननेही अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत धावगती वाढवली. शिखर धवन वेगावान शतक ठोकणार असे वाटत असतानाच केन रिचर्डसनने त्याला 96 धावांवर झेलबाद केले. शिखर शतक पूर्ण न करता बाद झाल्याने विराटही नाराज झाला. त्यातच विराट दुसऱ्या बाजूने धावगती चांगली ठेवण्यात यशस्वी होत असतानाच श्रेयस अय्यर झाम्पाचा यष्ट्यांमधील चेंडू आडवा मारण्याच्या नादात 7 धावांवर त्रिफळीचीत झाल्याने जास्तच नाराज झाला. 

त्यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने भारताला 34 व्या षटकात 200 चा टप्पा पार करुन दिला. दरम्यान त्याने आपले अर्धशतक 50 चेंडूत पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दितील 56 वे अर्धशतक आहे. विराट आणि लोकेश राहुलने भारताला 40 षटकापर्यंत 250 धावांपर्यंत पोहचवले. अखेरची 10 षटके राहिली असताना एकेरी दुहेरी धावा करत सेट झालेल्या राहुने विराटसोबत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारत 42 व्या षटकातच 270 धावांपर्यंत पोहचला होता. विराटही आपल्या शकताकडे वेगाने आगेकूच करत होता. पण, विराटच्या मार्गात पुन्हा झाम्पा आला. झाम्पाला षटकार मारण्याच्या नादात विराट स्टार्ककडे झेल देऊन 78 धावांवर झेलबाद झाला. विराट पोठोपाठ मनीष पांडेही मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. 

अखेरची 5 षटके राहिली असताना सेट झालेल्या राहुलच्या जोडीला जडेजा आला. या दोघांनी दमदार फलंदाजी करत भारताचा धावांचा डोंगर मोठा करण्यास सुरुवात केली. दरम्यान राहुलने 65 वी धाव घेत आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील 1000 धावा पूर्ण केल्या. त्यांनतर त्याने भारताला 340 धावांपर्यंत पोहचवले. तो डावाचे अखेरचे 2 चेंडू शिल्लक असताना 80 धावांवर बाद झाला. त्याने या 80 धावा 3 षटकात 6 चौकारांच्या मदतीने 52 चेंडूत ठोकल्या. त्याला जडेजाने नाबाद 20 धावा करुन चांगली साथ दिली.