ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Published On: Jun 26 2019 1:52AM | Last Updated: Jun 26 2019 1:49AM
Responsive image


लंडन : वृत्तसंस्था

विश्‍वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणार्‍या इंग्लंडचा संघ प्राथमिक फेरीतच गटांगळ्या खाऊ लागला आहे. लॉर्डस्वर मंगळवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना 64 धावांनी हरवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. इंग्लंड 8 गुणांसह चौथ्या स्थानावर असले तरी त्यांना आता उरलेले दोन सामने जिंकावेच लागणार आहेत किंवा जर-तरच्या समीकरणात अडकून पडावे लागणार आहे. कर्णधार अ‍ॅरोन फिंचचे शतक आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 7 बाद 285 धावा केल्या होत्या. जेसन बेहरेनडॉर्फ आणि मिचेल स्टार्क यांच्या भेदक मार्‍यापुढे इंग्लंडला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 221 धावांत गुंडाळला गेला. बेन स्टोक्सने 89 धावा करून दिलेली एकाकी झुंज इंग्लंडला वाचवू शकली नाही. फिंचला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. 

इंग्लंडचा हा विश्‍वचषकातील तिसरा पराभव ठरला. श्रीलंकेकडून झालेल्या अनपेक्षित पराभवातून सावरण्यासाठी इंग्लंडला या सामन्यात विजय आवश्यक होता. ऑस्ट्रेलियाच्या 286 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्यातील दुसर्‍याच चेंडूवर बेहरेनडॉर्फने सलामीवीर जेम्स विन्सला त्रिफळाचित करून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर चौथ्याच षटकांत स्टार्कने जो रूटला (8) पायचित केले. तसेच, त्यानंतरच्याच षटकात स्टार्कने इंग्लंडला कर्णधार मॉर्गनच्या रुपाने आणखी एक मोठा धक्‍का दिला. मॉर्गन बाद झाल्यानंतर 5.5 षटकांत 3 बाद 26 धावा अशी दयनीय स्थिती इंग्लंडची झाली. घरच्याच मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी एकामागून एक तीन धक्के दिल्याने इंग्लंडची सामना जिंकण्याची वाट बिकट झाली. बेन स्टोक्सने एकाकी लढत दिली; पण स्टार्कने त्याचा त्रिफळा उडवून इंग्लंडची लाईफलाईन कापून टाकली. शेवटी त्यांचा डाव 44.4 षटकांत 221 धावांवर थांबला. बेहरेनडॉर्फने 5 तर मिचेल स्टार्कने 4 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. याचा फायदा फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगलाच उचलला. या दोघांनी 123 धावांची सलामी देत इंग्लंडच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली; पण त्यानंतर वॉर्नर 53 धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर काही वेळात फिंचने शतक झळकावले. फिंचने 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 100 धावा केल्या; पण शतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही.

फिंच बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची 36 षटकांमध्ये 3 बाद 185 अशी स्थिती होती. यावेळीही ऑस्ट्रेलियाचा संघ साडेतीनशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते; पण फिंच बाद झाल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना तीनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

दमदार सलामीनंतर ऑस्ट्रेलियाला स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. कारण, सलामीवीरांनी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला होता. मात्र, मजबूत पाया रचूनही ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला त्यावर कळस चढवता आला नाही. ख्वाजा (23), स्मिथ (38), मॅक्सवेल (12), स्टोईनिस (8) आणि पॅट कमिन्स (1) यापैकी कोणालाही मोठे योगदान देता आले नाही. यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स केरीने नाबाद 38 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाला 285 धावांवर पोहोचता आले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 46 धावांत 2 विकेट घेतल्या. तर, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, बेन स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

डेव्हिड वॉर्नरच्या 500 धावा

यंदाच्या विश्‍वचषकात पहिल्यांदा 500 धावा करण्याची कामगिरी वॉर्नरच्या नावे झाली आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी वॉर्नरने त्याच्या सातव्या सामन्यांतच केली आहे. यामध्ये त्याच्या दोन शतकी खेळींचा समावेश आहे. क्रिकेटची पंढरी असणार्‍या लॉर्डस्वर पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या विरोधात खेळताना मंगळवारी पुन्हा वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्याने 61 चेंडूंचा सामना करताना 53 धावा केल्या.