Sat, May 25, 2019 11:10होमपेज › Sports › सर्वच संघ तुल्यबळ : कोहली

सर्वच संघ तुल्यबळ : कोहली

Published On: Mar 15 2019 1:50AM | Last Updated: Mar 14 2019 8:45PM
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

मर्यादित षटकांच्या सामन्यात गेले अनेक दिवस दमदार कामगिरी करणार्‍या भारतीय संघाला वर्ल्डकप विजयाचा प्रबळ दावेदार समजण्यात येत होते. परंतु, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मते वर्ल्डकप खेळणारे सर्वच संघ तुल्यबळ असून, ज्यांची सुरुवात चांगली होईल त्याला रोखणे मुश्कील होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा वन-डे सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता.

30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 2018 साली देशात आणि परदेशात चांगली कामगिरी करणार्‍या भारतीय संघाची नवीन वर्षात, घरच्या मैदानावरील पहिल्याच मालिकेत खराब सुरुवात झाली. अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघ विश्‍वचषक जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार असल्याचे मान्य केले आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघाला ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार मानत नाही. 

विराट म्हणाला, प्रत्येक संघ हा विश्‍वचषकामध्ये आमच्यासाठी धोकादायक आहे. ज्यांची सुरुवात चांगली होईल त्याला पुढच्या सामन्यांमध्ये थांबवणे सोपे जाणार नाही. त्यामुळे माझ्या मते कोणताही संघ विश्‍वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार नाही. प्रत्येक संघ तितकाच ताकदवान आहे. विंडीजचा संघ सध्या चांगला खेळतो आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघही सध्या समतोल आहेत. याचसोबत न्यूझीलंडच्या संघातही काही चांगले आणि स्फोटक खेळाडू आहेत. पाकिस्तानचा संघही कोणत्याही संघाला हरवू शकतो. 

विराट म्हणाला की, विश्‍वचषकासाठी भारतीय संघ हा जवळपास निश्‍चित झालेला असून, एका जागेसाठी विचार केला जाऊ शकतो, असे कोहलीने यावेळी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका 2-0 ने गमावल्यानंतर भारताला वन-डे मालिकेतही 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला.

30 मेपासून सुरू होणार्‍या वन-डे विश्‍वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका होती. यानंतर भारतीय खेळाडू 23 मार्चपासून आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यामुळे विश्‍वचषकासाठीच्या संघात कोणता खेळाडू आपले स्थान पक्के करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयपीएलची मजा घ्या; पण विश्रांतीही घ्या : विराटचा सल्‍ला

विश्‍वचषकापूर्वीचे भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय सामने संपले असून, सर्व खेळाडू आता 23 मार्चपासून आयपीएलमध्ये खेळतील. या स्पर्धेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वांना शुभेच्छा दिल्या असून, आयपीएलची मजा घ्या. परंतु, गरज वाटल्यास विश्रांतीही घ्या, असा सल्‍ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर विराट म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये आमची हीच चर्चा झाली की, पुढचे दोन महिने सर्वांनी आयपीएलचा आनंद घ्यावा. क्रिकेटमध्ये एखादा मोठा हंगाम खेळत असताना, त्याचा तुमच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 2018 पासून आतापर्यंत आम्ही सतत क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे थोडासा थकवा हा जाणवणारच. मात्र, आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने संघ खेळला आहे त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता आयपीएलमध्ये खेळाचा आनंद घ्यायला हवा.

30 मेपासून सुरू होणारा विश्‍वचषक आणि आयपीएलमध्ये अतिक्रिकेटचा तणाव या मुद्द्यावर आमची चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विश्रांतीची गरज असल्यास त्यांनी आपापल्या संघमालकांशी चर्चा करावी, अशा सूचना प्रत्येकाला देण्यात आलेल्या आहेत. विश्‍वचषक हा दर चार वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला यासाठी भारतीय संघाचा हिस्सा असावे हे वाटणारच; पण फ्रँचाईजींनाही आपल्या संघात महत्त्वाचा खेळाडू शेवटपर्यंत खेळावा असे वाटेल, त्यामुळे या मुद्द्यावर ज्याचा त्याने आपआपल्या पातळीवर मार्ग काढावा, असे विराट म्हणाला.