Tue, Nov 19, 2019 10:35होमपेज › Sports › शाकिब ‘ही’ कामगिरी करणारा पहिला बांगलादेशी 

शाकिब ‘ही’ कामगिरी करणारा पहिला बांगलादेशी 

Published On: Jun 24 2019 5:06PM | Last Updated: Jun 24 2019 5:59PM
साउथॅम्प्टन : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये बांगला देशने सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला आणि नंतर वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमी फायनलच्या रेसमधल्या आपल्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. आज त्यांचा मुकाबला अफगाणिस्तान सोबत होत आहे. या सामन्यात विजय मिळवत बांगला देशला सेमी फायनलची रेषा ओलांडण्यासाठी एक पाऊल पुढे टकाण्याची संधी आहे. बांगला देशच्या यंदाच्या वर्ल्डकप प्रवासात ऑल राऊंडर शाकिब-अल-हसनचे मोठे योगदान आहे. 

शाकिबने आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यात दोन शतके ठोकत ४२५ धावा केल्या आहेत. सध्या तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, त्याने आज ( २४ जून ) अफगाणिस्तानच्या विरुद्ध ५१ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे त्याने डेव्हिड वॉर्नरला (४४७ ) मागे टाकत नुकतेच अव्वल स्थान पटकावले. याचबरोबर त्याने वर्ल्डकपमधील आपल्या १ हजार  धावाही पूर्ण केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये एका बांगलादेशीने १ हजार धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच शाकिब वर्ल्डकपमध्ये १ हजार धावा करणारा १९ वा फलंदाज ठरला आहे.  शाकिबने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये पाचवेळा अर्धशतकाच्या पुढची खेळी केली आहे.         

बांगला देशने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यातील २ सामने जिंकले आहेत तर ३ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. सध्या ते पाच गुणांसह पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे त्यांना सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी या सामन्यातील विजय महत्वाचा ठरणार आहे. पण, अफगाणिस्तानने गेल्या सामन्यात भारताला कडवी झुंज दिली होती ते पाहता आज ते बांगला देशलाही चांगली झुंज देण्याची शक्यता आहे.