गुणांच्या ‘द्विशतका’ची टीम इंडियाला संधी

Last Updated: Oct 09 2019 10:08PM
Responsive image

    संकलन : किशोर कटके
 


यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ गुरुवारपासून दुसर्‍या कसोटी सामना खेळण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’मधील ‘टीम इंडिया’चा चौथा तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सामना असेल. नऊ संघांच्या या स्पर्धेमध्ये ‘टीम इंडिया’ आतापर्यंतचे आपले तीनही सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मात्र आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गुणांचे खातेदेखील खोलता आलेले नाही. ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ या स्पर्धेमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि बांगला देश असे 9 संघ सहभागी झाले आहेत. पाकिस्तान आणि बांगला देश या संघांनी अजून एकही सामना खेळलेला नाही. हे दोन देश सोडून इतर संघांमधील लढतीचा श्रीगणेशा झाला आहे.  

 भारत ‘द्विशतक’पासून 40 गुण दूर

भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये प्रत्येक विजयासाठी 40 गुण दिले जातात. यामुळे जर ‘टीम इंडिया’ 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पुणे कसोटी सामन्यात विजय संपादन करू शकली तर त्यांचे 200 गुण होतील. जर ‘टीम इंडिया’ तसे करण्यात यशस्वी झाली तर ती या स्पर्धेमध्ये 200 गुण म्हणजेच ‘द्विशतक’ नोंदविणारी पहिली टीम बनण्याचा बहुमान मिळवू शकेल.

 पुढील दोनपैकी 1 कसोटी जिंकणे आवश्यक

‘टीम इंडिया’ जर दुसरा कसोटी सामना पराभूत वा सामना अनिर्णीत झाला तरीसुद्धा भारत 200 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी ‘टीम इंडिया’ तिसरी कसोटी जिंकावीच लागेल. म्हणजेच ‘टीम इंडिया’ पुढील दोनपैकी एक जरी कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी झाली तरीही 200 गुण होऊ शकतील. तसेच, त्यामुळे अव्वल स्थानही कायम असेल. 

 ...अन्यथा बांगला देशविरुद्ध विजय आवश्यक

जर दक्षिण आफ्रिकेने ‘टीम इंडिया’ला पुढील दोन्ही कसोटी सामने जिंकू दिले नाहीत तर किंवा ते अनिर्णीत झाले तर काय होईल? असे घडूनही ‘टीम इंडिया’कडे या स्पर्धेमध्ये 200 गुण मिळवून पहिला संघ बनण्याची सुवर्णसंधी असेल. ती ‘टीम इंडिया’ला येत्या नोव्हेंबरमध्ये मिळेल. नोव्हेंबरमध्ये भारत आणि बांगला देश या संघांदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत भारताला गुणांचे द्विशतक साजरे करण्याची संधी निश्चितच मिळेल.

 ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने खेळलेत सर्वाधिक सामने

 या ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धेमधील आतापर्यंतचे सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघांनी खेळले आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच-पाच सामने खेळले आहेत. त्यानंतर भारताचा क्रम लागतो. न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज दोन-दोन तर दक्षिण आफ्रिकेने एक सामना खेळला आहे. 
 वेस्ट इंडिज-द. आफ्रिका या संघांना खोलायचे आहे खाते

 ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी भलेही या स्पर्धेत जास्तीतजास्त सामने खेळले असतील. परंतु, हे दोन्ही संघ गुणतालिकेमध्ये टॉप 3 मध्येही नाहीत. भारत 160 गुणांच्या जोरावर गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका 60-60 गुणांसह अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थावर आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 56 आणि इंग्लंड 56 तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांना एकही गुण मिळालेला नाही.