Tue, Jul 14, 2020 10:17होमपेज › Sports › वीस वर्षापूर्वीचा इतिहास भारत बदलणार का?

वीस वर्षापूर्वीचा इतिहास भारत बदलणार का?

Published On: Jun 13 2019 12:26PM | Last Updated: Jun 13 2019 3:45PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

यंदाच्या सुरू झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिमाखात विजय मिळवला. विश्वचषकातील भारताचा आज तिसरा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शिखर धवनच्या डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे भारत संघावर चिंतेचे सावट पसरले आहे. त्यामुळे किंवींचा वीस वर्षापूर्वीचा इतिहास भारत बदलणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विश्वचषकातील आज १८ वा सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो संघ गुणतालिकेत अग्रेसर ठरणार आहे. मात्र, भारत संघासाठी किंवीसोबतचा सामना अवघड आहे. कारण यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत किवींचा संघ अपराजित ठरला आहे. यासोबतच ज्या मैदानावर आज सामना होत आहे ते मैदान भारतासाठी अनलकी आहे. 

आजचा सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम मैदानावर खेळवण्यात येत आहे. वीस वर्षापूर्वीही याच मैदानावर याच महिन्यात भारताविरूद्ध न्यूझीलंडशी सामना खेळवण्यात आला होता. इंग्लंड येथे १९९९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड मध्ये सामना १२ जूनला नॉटिंगहॅम मैदानावर झाला होता. १९९९ मध्ये मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारताने निर्धारीत ५० षटकात धावा करत किवींसमोर २५२ धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये अजय जडेजाने ७६ धावा करत अर्धशतक ठोकले होते.

किवींनी भारताने ठेवलेल्या २५२ धावांचे आव्हान ४८.५ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. किवींच्या संघाकडून मॅट होर्न (७४) आणि रोजर टूज (नाबाद ६०) धावा करत अर्धशतक ठोकले होते.

यंदाचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा वीस वर्षापूर्वीचा इतिहास बदलण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत न्यूझीलंड आणि भारत संघामध्ये सात सामने झाले आहेत. यामधील चार सामने किंवींनी जिंकले आहेत. तर भारताने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात वीस वर्षापूर्वीचा इतिहास भारत बदलणार का? याबाबत उत्सुकता आहे.