Tue, Oct 24, 2017 16:57
29°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › टॉयलेट-एक प्रेमकथा : ‘स्वच्छ’ निखळ मनोरंजन

टॉयलेट-एक प्रेमकथा : ‘स्वच्छ’ निखळ मनोरंजन

Published On: Aug 12 2017 12:06PM | Last Updated: Aug 12 2017 12:06PM

बुकमार्क करा

पुणे : पुढारी ऑनलाइन

सामाजिक संदेश देणारे चित्रपट हल्ली व्यावसायिक व्याख्येत बसत नाहीत. असे चित्रपट 80 च्या दशकाच्या आधी बनत असत. त्यानंतर निव्वळ मनोरंजन करणार्‍या गल्‍ला भरू चित्रपटांचा काळ सुरू झाला. अर्थात त्यात काही देमार आणि काही विनोदी चित्रपटांनी आपले स्थान निर्माण केले. आता अपवादानेच एखादा चित्रपट सामाजिक समस्येवर निघतो. या पार्श्‍वभूमिवर श्री नारायण सिंग यांनी असे धाडस केले आहे. स्वच्छता हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’ या चित्रपटाची निर्मिती केली. 

आजही देशात 58 टक्के नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामागे लोकांच्या अंधश्रद्धा, सरकारच्या चांगल्या योजना गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिबात धडपडत नसलेले सुस्त प्रशासन आणि भ्रष्ट राजकारणी यांनी देशाला एका उकिरड्याचे स्वरुप कसे आणून ठेवले आहे. याचे चित्रण ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’ मध्ये पहावयास मिळते. उत्तर प्रदेशातील एका गावाची पार्श्‍वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. नायक अक्षय कुमार आपल्या कुटुंबाचे वर्षानुवर्षे चालत आलेले सायकलचे दुकान चालवत असतो. हरफन मौला असलेला अक्षय कुमार प्रगत विचाराच्या भूमि पेडणेकरला प्रेमात पाडतो. पुढे दोघांचे लग्‍न होते. पण आपल्या घरात शौचालय नाही. ही गोष्ट अक्षय तिच्यापासून दडवून ठेवतो. या विषयावरून दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होतात. वादाचे प्रसंग उद्भवतात. पुढे परिस्थिती घटस्फोटाचे प्रकरण दाखल करण्यापर्यंत जाते. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. 

हा चित्रपट मनोरंजन आणि समाज शिक्षण याचा समतोल राखणे बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे. अक्षय कुमारला तरुण दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न काही अंशी सफल झाला आहे. दुसरीकडे 2015 मध्ये आलेल्या ‘दम लगा के हाइशा’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या भूमि पेडणेकरने आपली चांगली छाप या चित्रपटात पाडली आहे. जुन्या पुराण्या रुढी-परंपरांमध्ये अडकलेले कुटुंब आणि मुक्‍त विचाराची पत्नी यामध्ये अडकलेल्या अक्षयकुमारने बर्‍यापैकी अभिनय वठवला आहे. तसे यापूर्वी त्याने अनेक विनोदी धाटणीच्या चित्रपटांत काम करून यशस्वी नायकाचा शिक्‍का बसवून घेतला आहे. त्यामुळे या चित्रपटात विनोदी प्रसंग सादर करताना त्याला कोणतीही अडचण जाणवली आहे असे वाटत नाही.  चित्रपटाच्या उत्तरार्धात अक्षय कुमारच्या काकाची भूमिका केलेल्या अनुपम खेरने धमाल उडवून दिली आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद अत्यंत मजेशीर वाटतात. 

1967 मध्ये मनोजकुमारने उपकार या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दोन वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध छेडले गेले होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली होती. पुढे तिचा प्रसार देशभर झाला. या घोषणेवर आधारित असलेला ‘उपकार’ प्रचंड लोकप्रिय झाला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चा नारा पंतप्रधानपद सांभाळताच क्षणीच दिला होता. प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेला हातभार लावण्याचा प्रयत्न
‘टॉयलेट - एक प्रेमकथा’ द्वारे झाला आहे. 

चित्रपट  टॉयलेट - एक प्रेमकथा
दिग्दर्शक : श्री नारायण सिंग
कलाकार : अक्षय कुमार, भूमि पेडणेकर 
स्टार : ****