Thu, May 28, 2020 11:57होमपेज › Soneri › 'मोगरा फुलला नातेसंबंध जोपासणारा चित्रपट'

'मोगरा फुलला नातेसंबंध जोपासणारा चित्रपट'

Published On: Jun 12 2019 12:29PM | Last Updated: Jun 12 2019 12:29PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

स्वप्नील जोशीचा चित्रपट म्हणूनही ‘मोगरा फुलला’बद्दल रसिकांमध्ये खूप उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले ट्रेलर, टीझर आणि पोस्टर्सना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे तसेच श्रावणी देवधर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून रसिकांसमोर येत आहे.

चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी स्वप्नील जोशी सांगतो, ‘मोगरा फुलला’मधील माझ्या सुनील कुलकर्णी या व्यक्तिरेखेची आई साकारली आहे. नीना कुळकर्णी यांनी. नीना कुळकर्णी आणि मी १४ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करतोय. या कौटुंबिक कथेतील आईला तिचे पती लवकर गेल्यावर आधार मिळतो तो तिच्या या धाकट्या मुलाचा. सुनीलची पत्नी आली तर त्यांच्यातील या प्रेमाचे वाटे होतील, अशी भीती तिला सतत वाटते. याच भीतीपोटी ती त्याला सांगून आलेल्या मुलींमध्ये दोष काढते आणि त्यांना नकार देते. पण सुनील आपल्या आईचे मन मोडायला धजावत नाही. ही तुमच्या-आमच्या आयुष्यातील सरळसाधी गोष्ट आहे.”

स्वप्नील पुढे म्हणाला, ‘हा एक नातेसंबंध जोपासणारा कौटुंबिक सिनेमा आहे. लग्नाचे वय निघून गेलेल्या मध्यमवयीन व्यक्ती जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडते तेव्हा आजूबाजूच्या लोकांची, घरातल्यांची काय प्रतिक्रिया असते, त्याचे प्रेम त्याला मिळते का? असे या सिनेमाचे कथानक आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. ही एका कुटुंबावर आलेल्या परिस्थितीची गोष्ट आहे. या सिनेमाची कथा खुप सरळ साधी आहे. यामध्ये परदेशात चित्रित केलेली गाणी, मारामारी नाही आहेत’.

‘मी स्वतः एक मध्यमवर्गीय मराठी मुलगा आहे. गिरगावत मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्या संस्कारात नातेसबंधांचा मोठा वाटा आहे. ‘पैसे कमावण सोपं असत, पण नाती जोपासण कठीण’ असे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वाक्य आहे, त्याचप्रमाणे सध्या आपण सगळे पैशांच्या पाठी लागलोय. पण अशा वेळेला असे सिनेमे येतात ते कुठेतरी थांबून विचार करायला भाग पाडतात’, असेही तो पुढे म्हणाला.

या चित्रपटाची गाणी अभिषेक कणखरनी लिहिली असून रोहित राऊतने ती संगीतबद्ध केली आहेत. शंकर महादेवन, रोहित राऊत, बेला शेंडे, जसराज जोशी यांनी ती गायली आहेत. चित्रपटात स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, याशिवाय सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नाळीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.