रमाबाई साकारण्याचा अनुभव कसा होता?, सांगत आहे शिवानी तिच्याच शब्दात

Published On: Sep 11 2019 3:36PM | Last Updated: Sep 11 2019 3:14PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

छोट्या पडद्यावरील मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथामध्ये बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे साकारत आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. सामाजिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड मेहनतही घेत आहे. 

रमाबाईंची भूमिका साकारताना आपल्या अनुभवाविषयी शिवानी म्हणते, 'आयुष्यातील ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारं हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठी पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करतेय. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होतोय. या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा प्रचंड दडपण होतं. मी याआधी अशा प्रकारची भूमिका केली नव्हती. पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर हळूहळू दडपण कमी होत गेलं.

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. अशा या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. रमाबाईंचं कणखर व्यक्तिमत्त्व साकारताना त्यांचे विचार आणि जिद्द माझ्या मनात खोलवर रुजतेय.'

'रमाबाईंची भूमिका साकारताना मला माझ्या आईचं मार्गदर्शन मिळालं. याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन. माझी आई शिक्षिका होती. माझ्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली आणि संपूर्णपणे मला वेळ देण्याचं ठरवलं. अभिनय क्षेत्रात येण्यासाठीही तिचा खंबीर पाठिंबा होता. मी पुण्यात वाढले, पण शूटिंगसाठी मुंबईला असते. आईच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालंय, असंही ती म्हणाली.' 

मालिकेत ग्रामीण भाषेचा वापर करण्याविषयी ती म्हणाली, 'ही भाषा आत्मसात करणं फार अवघड गेलं नाही. कारण नातलग, आप्तेष्ट यांच्या सहवासामुळे लहानपणापासूनच त्या भाषेचा लहेजा माझ्या कानावर पडत असे. त्यामुळे ही भाषा माझ्यासाठी नवी नव्हती. मालिकेच्या निमित्ताने रोजच या भाषेत संवाद साधतेय त्यामुळे त्यात सहजता आलीय. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या यापुढील प्रवासात डॉ. बाबासाहेबांचा विदेश प्रवास पाहायला मिळणार आहे.'