Thu, Mar 21, 2019 09:45होमपेज › Soneri › बार्शीच्‍या 'म्होरक्या'ने गाजवली दिल्‍ली  

बार्शीच्‍या 'म्होरक्या'ने गाजवली दिल्‍ली  

Published On: Apr 16 2018 12:55PM | Last Updated: Apr 16 2018 12:55PMस्‍वालिया शिकलगार : कोल्हापूर 

'म्होरक्या' असं म्हटलं की कसं वाटतयं? आहे की नाही नावात दम! होय, 'म्होरक्या' या चित्रपटात खरचं दम आहे. कारण, 'म्होरक्या' चित्रपटाला ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. हा चित्रपट अमर देवकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. १३ एप्रिलचा तो दिवस अमर देवकर यांच्यासाठी आनंदोत्सवाचा ठरला. 'म्होरक्या'ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून घोषित करण्यात आले. पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय स्तरावर अमर देवकर यांनी मिळवलेलं यश खरचं उल्लेखनीय आहे. याचनिमित्ताने 'पुढारी ऑनलाईन'ने लेखक, दिग्दर्शक अमर देवकर यांच्याशी खास संवाद साधला. पाहुया, 'म्होरक्या' कसा घडला? 

अमर देवकर यांच्या ‘म्होरक्या’ चित्रपटाला याआधीही पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विविध पुरस्कार मिळाले आहेत. स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित 'म्होरक्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून रमण देवकर याने भूमिका साकारलीय. तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी गिरीष जांभळीकर यांनी केलीय. 'पिफ'मध्ये रमण देवकरला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि गिरीष जांभळीकर यांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला होता. 'पिफ'नंतर आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे 'म्होरक्या'चं चौफेर यश वाखाण्याजोगं आहे. 

सोलापूरच्या बार्शीचा 'म्होरक्या
सोलापुरातील बार्शीसारख्या दुष्काळी भागातील अमर देवकर यांनी जिद्द मनात कायम ठेवून राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलं. अमर देवकर यांचा चित्रपट दिग्दर्शन, अभिनयातील प्रवास तसा खडतर आहे. त्यांनी शिवाजी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला विभागात  देवकर यांनी प्रवेशासाठी पर्यत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी ८२ लघुपट तयार केले. 

Image may contain: one or more people and text

मनातल्या गोष्टी मोठ्या पडद्यावर 
एक नाट्य कलावंत, हौशी कलावंत म्हणून गेल्या १३-१४ वर्षांपासून काम करत आलेले दिग्दर्शक अमर देवकर यांना चित्रपट काढावा, अशी इच्छा होतीच. परंतु, त्यासाठी लागणारं आर्थिक बळ, तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी आणि विशेष म्हणजे चित्रपट काढण्यासाठी कौशल्याची गरज होती. म्हणून अमर देवकर यांनी ॲकॅडमिक प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं आणि थेट पुणे गाठलं. २०११-१२ मध्ये पुणे विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ स्टडिजमधून फिल्म मेकिंगमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली आणि तेथूनचं त्यांच्या सिनेसृष्टीच्या करिअरला दिशा मिळाली. चित्रपटांचा अभ्यास करत असताना कोठेतरी त्यांच्या मनात सलत होतं की, आपण काहीतरी करायला हवं. मनातल्या गोष्टी पडद्यावर आणाव्यात आणि त्याचदृष्टीने अमर देवकर यांचा प्रवास सुरू झाला. 

असा घडला म्होरक्याचा प्रवास
अमर देवकर म्हणाले, 'चित्रपटाच्या माध्यमातून मनातले विचार व्यक्त होण्याची इच्छा होती. त्याचदृष्टीने माझी बौद्धिक, मानसिक, शारीरिक ताकद, पात्रता तयार होत गेली. हे करत असताना २०१४ मध्ये 'म्होरक्या'ची गोष्ट सूचली. दोन -अडीच वर्षे अभ्यास करून म्होरक्याचं स्क्रिप्ट मी स्वत: लिहिलं. ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या उभ्या केल्या आणि निर्मात्याचा शोध घेणं सुरू झाला. अनेक अडचणींचा सामना करत 'म्होरक्या'चा प्रवास सुरू झाला आणि आज 'म्होरक्या'ला तब्बल ६ पुरस्कार मिळाले. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले.' 

Image may contain: 1 person, beard, hat and outdoor

एक चित्रपट अभ्यासक, दिग्दर्शक म्हणून काम करत असताना स्वत:च्या आणि बाहेरच्या-अवतीभोवतीच्या सगळ्याचं गोष्टींकडे एका सृजनात्मक दृष्टीकोनातून, संवेदनशीलपणे आपण पाहत असतो. अशा असंख्य गोष्टी पाहत त्याची नोंद डायरीमध्ये घेत असतो. मग, त्यातल्या कोणत्या गोष्टी भक्कमपणे, दर्जेदारपणे मांडता येईल याचा विचार करताना मला जवळची वाटलेली म्होरक्याची कथा मी निवडली. चित्रपटसृष्टीत ज्यावेळी आपण पाऊल टाकतो. तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या खर्चिक बाबी आहे, आर्थिक बाबी त्या उपलब्ध करण्यासाठी माझ्यासाठी शक्यच नव्हते. माझ्यासारख्या एका कलाकाराला इतकी मोठी रक्कम उभी करणे, परवडणारं नव्हतं. त्यामुळे अनेक निर्मात्यांशी डिल करण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला. पण, सकारात्मक उत्तर मिळालं नाही, असं त्यांनी सांगितलं. 

शेती गहाण ठेऊन उभारला पैसा 
अमर यांना हा चित्रपट काढण्यासाठी मामाची शेती गहाण ठेवून पैसा उभा करावा, असं वाटलं होतं. परंतु, मामाची शेती गहाण ठेवली नाही. 'आयडेंटिटि'च्या पुरस्काराची रक्कम जमा झाली होती. त्यातून मग, सहकाऱ्यांना घेऊन चित्रपटाच्या पूर्वी जी तयारी असते, ती करण्यास तीन-चार महिने सुरूवात केली होती. योगायोगाने त्यांना सोलापूरच्या स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शनशी भेट झाली होती. त्या प्रोडक्शन टीमने त्यांच्या हातातला प्रोजेक्ट बाजूला ठेऊन 'म्होरक्या'वर लक्ष दिलं. आर्थिक पाठिंबा देण्यासाठीची जबाबदारी त्या प्रोडक्शनने घेतली. त्याप्रमाणे चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यासाठी अमर देवकर यांनी त्यांची स्वत:ची दोन एकर शेती विकून पैसा उभा केला.  

घरच्या मंडळींचा पाठिंबा 
अमर यांना चित्रपट निर्मितीसाठी घरच्या मंडळींचा पाठिंबा होता. त्यासाठी तीन-चार महिन्यांपासून त्यांचं काम सुरू होतं. त्यांचं काम, आत्मविश्वास पाहून घरच्यांनी शेती विकण्यास परवानगी दिली. 'म्होरक्या' साकारायला मित्र-परिवाराचाही पाठिंबा मिळाला. आई-वडिल, भाऊ, बहिण यांचे तसेच १५-२० वर्षांपासून असलेले जिवलग मित्र, गुरूजन, गावकरी, निर्माते यांनी अमर यांच्या कामावर विश्वास ठेवून मदत केली. 

'म्होरक्या'ची कहाणी 'नेतृत्वा'ची 
'म्होरक्या'ची कथा सांगताना अमर म्हणाले, 'या चित्रपटाच्या माध्यमातून नेतृत्व कसं असावं, हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. मेंढ्या राखण्याचं काम करावा लागणारा एक १३-१४ वर्षांचा मुलगा असतो. शाळेमध्ये त्याचं नाव आहे. परंतु, त्याला मेंढ्या राखाव्या लागतात. मग, अचानक त्याला शाळेत जावं लागतं. शाळेत २६ जानेवारीसाठीची वर्गमित्रांची तयारी तो पाहतो आणि २५ मुलं त्याच्या मागे उभे राहतात. त्यांचा लीडर म्हणून तो मुलगा उभा राहतो. त्याच्या आधी तो मुलगा मेंढ्या राखताना २०-२५ मेंढ्यांच्या पुढे चालत असतो. त्याला साधी गोष्ट वाटत असते की, मेंढ्या नाही ही २५ मुलं माझ्या मागे आली पाहिजेत. तसा त्या मुलाचा स्ट्रगल सुरू होतो. स्वत:ला आपण कसं लीड करावं, कुटुंबाला कसं लीड करावं, पुढाकार घेऊन समाजाचं नेतृत्व कसं करावं, त्यातलं तत्वज्ञान या सर्व संदर्भांना स्पर्श करत चित्रपट पूर्णत्वाकडे जातो.' 

'म्होरक्या' नाव सूचलं असं...
'म्होरक्या' हे नाव कसं सूचलं, यावर अमर म्हणाले, 'ज्या विषयावर चित्रपट बनवत होतो. त्याविषयाला अनुसरून नावं दिलं.' नेतृत्वाची माझी संकल्पना, अस्सल ग्रामीण शब्द म्होरक्या, तो सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा म्होरक्या...म्हणून म्होरक्या असं चित्रपटाला नावं दिलं. 

आगामी चित्रपट
आगामी चित्रपटांचे स्क्रिप्ट, त्याचा अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी चित्रपटासाठी लागणारी साधनसामुग्री उभारणे गरजेच आहे. या सगळ्या गोष्टी मी एकटा करू शकत नाही. तर त्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळणे आवश्यक असतं. या चित्रपटाची निर्मिती ही माझ्या एकट्याची नाही. ती माझी अभिव्यक्ती आहे, ती संपूर्ण टीमने दृक-श्राव्य माध्यमातून पडद्यावर साकारलीय. त्यासाठी सर्वांची मेहनत कामी आली. ग्रामीण भागात खूप टॅलेंटेड लोक आहेत. ते समोर येत नाही किंवा त्यांना तसं व्यासपीठ मिळत नाही. चित्रपट करताना मी त्या-त्या भागातील, परिसरातील लोकांना अभिनयासाठी प्राधान्य देतो. ग्रामीण जीवनशैली, मी अनुभवलेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या घटकांवर भविष्यात चित्रपट होऊ शकेल. म्होरक्यासारख्या कथेसारखी, तशा आशयाच्या चित्रपटांच्या पलीकडे जाऊनही चित्रपट होऊ शकेल, असंही ते म्हणाले.  

पुरस्काराची घोषणा होताच जल्लोष... 
मी माझ्या घरी कुटुंबासोबत होतो. टीव्हीवर ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होत होती. सगळ्यांनाच हूरहूर लागली होती आणि अचानक घोषणा झाली की, स्पेशल मेन्शनमध्ये 'म्होरक्या'ला पुरस्कार. यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. लगेचच सर्वोत्कृष्ट बालचित्रपट -म्होरक्या अशीही घोषणा ऐकू आली. त्यावेळी मन भरून आलं. माझा आनंद गगनात मावेना, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

वडिलांचं स्वप्न साकारलं 
एक कलावंत होण्याच माझ्या वडिलांचं स्वप्न साकारलं. त्यांनी प्रत्येक वेळी मला पाठिंबा दिला. म्हणूनचं हे यश आता माझ्या हाती पडलं आहे. 
                                                                                                                                                                                      - दिग्दर्शक अमर देवकर  

Image may contain: Sachin Topale, smiling, beard, close-up and outdoor

Tags : 65th national film awards, pudhari, pudhari online, marathi film mhorkya, director amar deokar interview, solapur, barshi.