होमपेज › Soneri › अमोल कागणेचा धडाकेबाज 'वाजवुया बँड बाजा' 

अमोल कागणेचा धडाकेबाज 'वाजवुया बँड बाजा' 

Published On: Aug 21 2019 2:30PM | Last Updated: Aug 21 2019 2:30PM

अमोल लक्ष्मण कागणे आणि शिवाजी लोटण पाटील पुन्हा एकत्र मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अमोल कागणे फिल्म्स आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकसारख्या जाचक रूढीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 'हलाल' या यशस्वी चित्रपटानंतर पहिल्यांदाच हे अवलिया निर्माते-दिग्दर्शक रसिक-प्रेक्षकांसाठी काहीतरी हटके घेऊन येणार आहेत. नेहमीच चौकटी बाहेरील कथाविषय निवडणारी ही जोडी आता एक हलका-फुलका विनोदी चित्रपट घेऊन आले असून 'वाजवुया बँड बाजा ' हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनमुराद हसवेल यात काही शंका नाही 

शिवाजी लोटण पाटील आणि अमोल लक्ष्मण कागणे यांनी ३१ ऑक्टोबर, हलाल, गवर्मेंट रेसोल्युशन भोंगा असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.

अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित 'वाजवुया बँड बाजा' या चित्रपटाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की हा चित्रपट लग्नोत्सुकांवर आधारित आहे. 'हलाल', 'लेथ जोशी', 'परफ्युम' यांसारख्या सामाजिक चित्रपटांनंतर 'वाजवुया बँड बाजा'सारखा तद्दन मसालेदार विनोदी चित्रपट आणण्यामागचा हेतू  निर्माते अमोल कागणे यांनी सांगितला. ''आतापर्यंत मी माझ्या संस्थेद्वारे निर्मिलेले चित्रपट समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या वृत्तीतून घडले पण 'वाजवुया बँड बाजा' हा चित्रपट वेगळा आहे. प्रेक्षकांना घटकाभर खळखळून हसता यावं. त्यांच्या मनावरील ताण काही काळ का होई ना हलका व्हावा, याकरिता अशा चित्रपटांची सुद्धा गरज आहे. हीच गोष्ट लक्षात घेत मी व शिवाजी सरांनी हा चित्रपट बनवण्याचं धाडस केलं आहे.'' 

संदीप नाईक लिखित 'वाजवुया बँड बाजा'ची कथा आहे एक नाही दोन नाही तीन-तीन लग्नोत्सुक जोडप्यांची. ही तीन जोडपी कोण आहेत हे अजून गुलदस्त्यात असून मराठी मनोरंजन क्षेत्रातले अनेक दिग्ग्ज या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची पटकथा-संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहे तर छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असणार आहे. संगीत-विजय गटलेवार, गायक-आदर्श शिंदे, संकलन-निलेश गावंड यांनी केले आहे.