होमपेज › Soneri › जेव्हा अमिताभ बच्चन मराठीतून शुभेच्छा देतात!

जेव्हा अमिताभ बच्चन मराठीतून शुभेच्छा देतात!

Published On: Jul 12 2019 2:29PM | Last Updated: Jul 12 2019 2:29PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

पांडुरंगाच्या आंतरिक ओढीने गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून पायी चालत निघालेले लाखो वैष्णवांचे भार पंढरीत दाखल झाले आहेत. आज (दि.१२) होत असलेल्या आषाढी एकादशीसाठी वारकरी मांदियाळीने पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून गेली. आषाढी एकादशीनिमित्त बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्‍चन यांनीदेखील विठ्ठलभक्तांना मराठीत ट्विट करत शुभेच्छा दिल्या. 

आषाढी एकादशीनिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी मराठीत ट्विट करत विठ्ठलभक्तांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठल- रखुमाईची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहू दे अशी प्रार्थना बच्चन यांनी केली आहे. 

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. राज्यात चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे कल्याण व्हावे असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठोबाच्या चरणी घातले. दरम्यान, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून महापूजेला उपस्थित राहण्याचा मान लातूरचे वारकरी विठ्ठल मारुती चव्हाण आणि  प्रयाग मारुती चव्हाण या शेतकरी दाम्‍पत्यास मिळाला.

आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना! असा पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठीत शुभेच्छा संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा आणि वारीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.