Sat, Jan 25, 2020 08:25होमपेज › Soneri › पुरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांची 'इतक्या' लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

पुरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांचे ५१ लाख

Published On: Aug 19 2019 3:40PM | Last Updated: Aug 19 2019 3:40PM

संग्रहीत फोटो.मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर आणि सांगली व सातारा जिल्‍ह्‍यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिवसेंदिवस मदतीचा ओघ वाढताना दिसत आहे.  मराठी चित्रपटसृष्‍टी प्रमाणे आता बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. अमिताभ यांनी आपल्या मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांचे आभार मानले.

 बॉलिवूड कलाकार मदत करण्यात मागे राहिल्याने चौफेर टीका झाली. बॉलिवुडमधील काही कलाकारांनी पुरग्रस्तांच्या हाकेला धावून जात मदत देण्याचा निर्णय घेतला. अर्थात, काही कलाकांरांनी टीका होण्यापूर्वीच पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे. 

रिलायन्सकडून ५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेक स्वरुपात जमा केली. 

मुंबईचे डबेवाले, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, बॉलिवूड अभिनेते तसेच अनेक उद्योजक, सामाजिक संस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आर्थिक मदत पोहोचवली आहे. दुसऱ्या बाजूला काही व्यक्ती, सामाजिक संस्था आदी मंडळींनी थेट घटनास्थळावरच मदत पोहोचवली आहे. त्यामुळे काही मंडळींनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत न पोहोचवतात थेट पीडितांपर्यंतही आपली मदत पोहोचवताना दिसत आहेत.