Sat, Dec 14, 2019 06:03होमपेज › Soneri › रितेश-जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

रितेश-जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

Published On: Aug 13 2019 1:29PM | Last Updated: Aug 13 2019 1:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. काही मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. अनेक व्यक्ती, संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. त्यामध्ये सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनीही पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदत दिली आहे. मदत करणाऱ्यांच्या यादीमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलियाचा समावेश झाला आहे. रितेश-जेनेलियाने पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा २५ लाखांचा धनादेश सोपवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, 'रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचे आभार मानतो'.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकीकडे मराठी कलाकार पुढे आले आहेत. मात्र, बॉलिवूड कलाकारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. याआर्श्वभूमिवर हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांवर सोशल मीडियावरून टिका होत आहे.  

अमेय खोपकरांची पोस्ट...

अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर मराठी कलाकारांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’ असे म्हणत त्यांनी हिंदी कलाकारांवरही टिका केली आहे.