Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Soneri › बोलबाला महिला दिग्दर्शकांचा

बोलबाला महिला दिग्दर्शकांचा

Published On: Sep 14 2018 1:37AM | Last Updated: Sep 13 2018 9:01PMबॉलीवूडमध्ये किरण राव, फराह खान, दीपा मेहता, अपर्णा सेन, मीरा नायर, अनुषा रिझवी, लीना यादव सारखी अनेक नावे दिग्दर्शनात  प्रसिद्ध आहेतच. आताच्या काळात मेघना गुलजार, अश्‍विनीच नव्हे तर रीमा कांगती, झोया अख्तर, गौरी शिंदे यांसह अनेक महिला दिग्दर्शकांनी हे सिद्ध केले आहे की त्या यशस्वी चित्रपट देऊ शकतात. या महिला दिग्दर्शकांनी यशस्वी चित्रपटांचा फॉर्म्युला समजून घेतला आहे. 

‘राझी’ नंतर मेघना गुलजारचे विश्‍वच पालटले आहे. प्रत्येक बड्या निर्माता कंपनीला तिने आपल्या बॅनरसाठी काम करावे असे वाटते आहे. मेघना मात्र आलेल्या सर्व ऑफर्सचा अंदाज घेते आहे.  
‘बरेली की बर्फी’ हा अश्‍विनीचा तिसरा चित्रपट. या चित्रपटाने यशाची चव तिने चाखली. प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांची ती पत्नी होय. अश्‍विनी अय्यरने नवर्‍याला सहकार्य करत स्वतःची वेगळी वाट निर्माण केली. तिचा पहिला चित्रपट ‘नील बटे सन्नाटा’ ने कौतुकाची थाप जरूर मिळवली; पण त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला नाही. तमीळमधल्या चित्रपटाने मात्र कौतुक आणि यश दोन्हीही मिळवून दिले. अश्‍विनीसाठी इतके पुरेसे होते.  ती सध्या बालाजी प्रॉडक्शन्ससाठी दोन चित्रपट बनवत आहे. यामध्ये एका चित्रपटाचे ती दिग्दर्शन करत आहे तर एका चित्रपटाची निर्मिती करते आहे.  

आमिर खानला घेऊन ‘तलाश’ नावाचा चित्रपट केल्यानंतर  रीमा कांगतीला स्टार दिग्दर्शक म्हणवले जाऊ लागले. अर्थात तीचा वकूबही तितकाच आहे. ‘तलाश’ खूप हीट झाला. त्यामुळेच तिचा आत्मविश्‍वास दृढ झाला.  अक्षयकुमारबरोबर ‘गोल्ड’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट सौदी अरेबियातही प्रदर्शित होणार आहे.  

जावेद अख्तर यांची कन्या असल्यामुळे झोया अख्तरला स्वतःची विस्तृत ओळख करून द्यावी लागली नाही. सुरुवातीलाच तिला संधी मिळत गेली त्यामुळे तिला यश मिळत गेले. मात्र 2009 मध्ये ‘लक बाय चान्स’ ने तिला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांतून ती पुन्हा एकदा मजबुतीने पुढे आली. आपल्या तिसर्‍या चित्रपटात ‘दिल धडकने दो’ मध्ये तिने स्वतःला पुन्हा सिद्ध केले. मोठे बजेट आणि बडे कलाकार घेऊनही तिला चित्रपट दिग्दर्शन करता येऊ शकते हे यानिमित्ताने सिद्ध झाले. आता ती ‘गली बॉईज’ या चित्रपटाचा विचार याच पद्धतीने करते आहे. 

फराह खानने आत्तापर्यंत चार चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातील फक्‍त ‘तीसमार खां’ ला बॉक्स ऑफिसवर निराशा पदरी पडली. इतर तीनही चित्रपट यशस्वी झाले होते. या तीनही चित्रपटांमध्ये शाहरुख खान होताच. ‘हॅप्पी न्यू इअर’नंतर शाहरुखने कोणताही चित्रपट केला नाही तर फराह खाननेही नवा चित्रपट केला नाही. फराहच्या चित्रपटांच्या यशात शाहरुख खानचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते. फराह देखील ही गोष्ट मान्य करते की तिला दिग्दर्शक म्हणून उभे करण्यात शाहरुखचा मोठा वाटा आहे. येणार्‍या काळात काही बडे कलाकार घेऊन नवा चित्रपट निर्माण करण्याचा फराहचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. फराहला वेगळ्या वाटेने न जाता तद्दन व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करायची असल्याने तिचे ध्येय स्पष्ट आहे. त्या दृष्टीने ती इतर महिला दिग्दर्शकांपेक्षा वेगळीच आहे.  

‘इंग्लिश विग्लिंश’ या चित्रपटामुळे गौरी शिंदे प्रकाशझोतात आली. हा चित्रपटचांगला होता मात्र तिकीट खिडकीवर तो सामान्य ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. ‘डिअर जिंदगी’मध्येही प्रेक्षकांची नस तिला पकडता आली नाही. हा चित्रपटही सर्वसाधारणच होता.

- अपर्णा देवकर