होमपेज › Soneri › भन्नाट लोकांच्या भन्नाट कथा : सुपर डिलक्स 

भन्नाट लोकांच्या भन्नाट कथा : सुपर डिलक्स 

Published On: Jul 12 2019 1:39AM | Last Updated: Jul 11 2019 10:21PM
सुपर डिलक्स चित्रपट हा चार कथांमध्ये विभागला गेला आहे. चारही कथा वेगवेगळ्या. पण या चारही कथा एका दिवसाच्या गणितात बसवून दिग्दर्शकाने आपल्या समोर मांडल्या आहेत. या चारही कथा भिन्न असून त्या एकाच दोर्‍यात व्यवस्थित बांधल्या आहेत.  तर या कथा एकाच शहरातल्या चार विविध भागात घडतात. 

पहिली कथा एका स्ट्रगल करणार्‍या अभिनेत्याबरोबर घडते. त्याला आपल्या बायकोचे अनैतिक संबंध एका विचित्र घटनेतून सामोरे येतात. आणि मग त्यांची पुढे कशी गोची होते, हे आपल्यासमोर येत जातं. दुसरी गोष्ट आहे चार शाळेत जाणार्‍या मुलांची. ती मुलं शाळा चुकवून मित्राच्या घरी चोरून सिनेमा बघायचा बेत आखतात. सिनेमा बघायला बसल्यावर एकाला धक्काच बसतो. आता तो धक्का नक्की का बसतो, असा कोणता सिनेमा तो पाहतो, हे सिनेमात बघणं उचित ठरेल.  तिसरी गोष्ट आहे शिल्पा नावाच्या तृतीयपंथीची. पुरुष म्हणून घर सोडून गेलेली शिल्पा आणि बर्‍याच वर्षांनी बाईच्या वेशात घरात प्रवेश करणं, इथं तिसर्‍या गोष्टीचं बीज पेरलं आहे. आता घरातला कर्ता पुरुष घरात असा प्रवेश घेतो, त्यात त्याला एक लहान मुलगा आहे, घरातले इतर लोक आहेत, त्याची बायको आहे; अशा वेळी त्याची काय अवस्था होते आणि पुढं जाऊन त्याचा त्या कुटुंबांवर काय परिणाम होतो हे या तिसर्‍या गोष्टीत सांगितलं आहे. 

चौथी गोष्ट आहे एका बाबाची. हा बाबा लोकांना त्सुनामी बाबा म्हणून फसवत आहे. लोकांचे इलाज वगैरे करत आहे. पण बाबा लोकांना फसवत आहे की बाबा स्वतःच फसतोय, याचं उत्तर या सिनेमात आहे. 

या सिनेमातली प्रत्येक व्यक्तिरेखा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने ते उत्तम प्रकारे सादर केली आहे. सिनेमा जसा जसा पुढं जाईल तसं आपण त्या लोकांना कनेक्ट होत जातो. चार गोष्टी वेगळ्या चालत असल्या तरी त्यात एक सुसूत्रता आहे, सगळ्यांमध्ये एक धागा आहे, जो की अतिशय उत्तम प्रकारे सगळ्या कथांमध्ये गुंफला आहे.

- सुमित गाडगीळ