Wed, May 22, 2019 20:18होमपेज › Soneri › रिस्पेक्टो : गली बॉय

रिस्पेक्टो : गली बॉय

Published On: Mar 15 2019 1:49AM | Last Updated: Mar 14 2019 8:36PM
डॉ. अनमोल कोठाडिया

हिपहॉप/रॅप : सामाजिक आणि राजकीय विधान

हिपहॉप/रॅप म्हणजे केवळ विशिष्ट पद्धतीचे कविता/गीत, ठेका, वाद्यसाधने, नृत्यप्रकार नव्हे. त्या तर केवळ वरवरच्या बाबी झाल्या. खर्‍या अर्थाने हिपहॉप/रॅप म्हणजे एक विद्रोही स्पंदनांचा आविष्कार असतो. अस्सल हिपहॉप/रॅपला सामाजिक आणि राजकीय परिमाण असतेच असते. ते अगदी याच्या उगमापासूनच मिळतो. अमेरिकेतील बकाल वस्त्यांतील कृष्णवर्णीयांकडून या कलाप्रकाराची सुरुवात 1980च्या  दशकात झाली. तरुणांमधील बंडखोर प्रेरणेस सात्म्य झाल्याने याचा जगभरात चांगलाच प्रसार झाला, चित्रपटांमधूनही तो आला. या पार्श्‍वभूमीवरचे अलीकडे पाहिलेले दोन चित्रपट -

’गली बॉय’: सामाजिक रॅप

अगदी धारावीसारख्या बकाल वस्तीमध्ये अतिशय हलाखीत जगणार्‍यांच्या हृदयातील स्पंदनांचे कविता/गाणेही शक्य असते. अशा अस्सल कवितांना तालाची जोड मिळाली की रॅप तयार होतो. परिस्थितीच्या प्रत्येक फटकार्‍यास रॅपचा प्रत्याघात मग झणत्कारी जाणीव करून देतो. मुस्लिम कुटुंबात खुरट्या पितृवर्चस्वी घरात वाढणारा कौटुंबिक ताणतणावांनी आणि आर्थिक ताणाने पिचलेला तरुण नायक मुराद (रणवीर सिंग) हाच पुढे ‘गली बॉय’ या नावाने यशस्वी रॅपर होतो, त्याची ही संघर्षांसाठीची वास्तववादी धाटणीत साकारलेली प्रेमकथा. तो त्याचे रॅप गीत प्रथितयश शेरकडे (सिद्धांत चतुर्वेदी) घेऊन जातो, तर तो त्यास स्वतःचे रॅप स्वतःच गाण्याचा सल्ला देतो. त्यास मोलाची साथ देणारी प्रसंगी चोर्‍यामार्‍या करणारी त्याची मित्रमंडळी आणि शाळेपासूनच त्याच्यावर प्रेम करणारी, मेडिकलचे शिक्षण घेणारी, वडिलांकडे प्रॅक्टिस करणारी अशी स्वत्व जपणारी सफीना (आलीया भट्ट) असा त्याचा गोतावळा. विजय राज, कल्की कोचलीन, अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष असा अभिनयसंच. विषमता, धर्मांधता, अभिव्यक्तीवरील बंधने, संवेदनशील मनाची गोची, वेदना, स्वातंत्र्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुणाईची बंडखोरीची प्रेरणा (जाहिरात बोर्डांचे सर्जनशील विरूपीकरण करणारा ग्राफिटी प्रसंग) झोया अख्तर हिने बॉलीवूडी प्रेक्षकांना सात्म्य होईल, अशा काहीशा पॉलिश्ड मुलाम्यातून संतुलन साधत मांडली आहे. अर्थात रॉनेस असता तर अधिक गहराई आली असती. मुंबईतील नेझी आणि डिव्हाइन या रॅपर्सवर आधारित या चित्रपटात स्पर्धेच्या दृश्यांवेळी वापरलेले अन्य रॅपर्स हे वास्तविक रॅपर्सच आहेत. नायकाच्या कविता (जावेद अख्तर) वगळता अन्य रॅपगीते रॅपर्सचीच. जिंगोस्तान, आझादी सारख्या गाण्यांमुळे काहीसी राजकीय झालरही येते.  

रिस्पेक्टो : प्रखर राजकीय हिपहॉप

बकाल वस्तीत राहणारा हेन्ड्रिक्स हा युवक मुळात हिपहॉप कलाकार आहे. अधूनमधून तो हिपहॉपमधील जुगलबंदीतही अयशस्वी सहभाग घेत असतो. पण परिस्थितीमुळे पिचल्यामुळे त्याच्यावर चोर्‍यामार्‍या करायची वेळ येते. आपल्या समवयस्क मित्रांबरोबर वस्तीतीलच पुस्तक विक्रेत्याचे दुकान लुटण्याच्या प्रयत्नात ते सापडतात. हा विक्रेता मुळात कवी असतो. मात्र हुकूमशाही राजवटीत त्याच्या अभिव्यक्तीवर बंधने आल्यामुळे तो शांतपणे  जीवन व्यतीत करत असतो. या मुलांविरोधातील तक्रार तो मागे घेतो आणि सुधार-शिक्षा म्हणून त्यांनी त्याचे दुकान आवरून पूर्ववत करण्याचे ठरते. त्या ओघात या म्हातार्‍या कवीबरोबर या मुलांचे चांगलेच सूत जुळते. दरम्यान म्हातार्‍याचा मुलगा असणारा पोलिस दुकानात येतो तेव्हा तो या मुलांच्या तपासणीचे नाटक करत त्यांच्यापैकी मुलीचा विनयभंग करतो. म्हातारा तेव्हा  स्वतःच्या मुलाकडे शोषक म्हणून  रागाने पाहतो तर मुलांशी त्याचे शोषित म्हणून एक नाते निर्माण होते. म्हातार्‍याच्या डायरीतील कविता हेन्ड्रिक्सला मिळाल्यावर तो जुगलबंदीत त्यांचा स्वतःच्या कविता म्हणून यशस्वी ठरत असतानाच म्हातारा तेथे पोचून त्याचे बिंग फोडतो. त्यास स्वत्वाची जाणीव  देतो.अर्थात हिपहॉप म्हणजे केवळ ऊर्जेचे रेचन करणारा व्यायाम नृत्यप्रकार नसून ते एक राजकीय विधान असते, अशी जाणीव करून देणारा ’रिस्पेक्टो’(2017) हा फिलिपाईन्सचा चित्रपट यंदाच्या पिफमध्ये पाहिला होता.