Sat, May 25, 2019 10:38होमपेज › Soneri › रंगछटा : विक्रमादित्य प्रशांत दामले लंडन टूरला

रंगछटा : विक्रमादित्य प्रशांत दामले लंडन टूरला

Published On: Mar 15 2019 1:49AM | Last Updated: Mar 14 2019 8:39PM
संजय कुळकर्णी

व्यावसायिक रंगभूमीवर बुकिंग सम्राट कोण आहे? असा प्रश्‍न जर विचारला गेला तर प्रशांत दामले हेच उत्तर असेल. हाच प्रश्‍न अमिताभ बच्चनच्या ‘कोन बनेगा करोडपती’ यात विचारला गेला तर तो उत्तर देणार्‍या व्यक्तीला विचारेल, लॉक किया जाय  आणि लॉक केले जाईल.

खरोखरी प्रशांत दामले टूरटूर या नाटकाद्वारे जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर आला तेव्हा त्याला वाटलंसुद्धा नसेल की आपण हाऊसफुल्लचे सम्राट होणार आहोत. ती किमया कालांतराने त्यांनी केली हे कुणालाच नाकबूल करता येणार नाही.  डॉ. काशिनाथ घाणेकरांनंतर त्याचे नाव घेतले तरीही त्यासंबंधात कुणीही आक्षेप घेणार नाही. सुधीर भट यांचा तो लाडका अभिनेता होता. म्हणूनच त्यांनी प्रशांतला घेऊन अनेक विनोदी नाटकांची निर्मिती केली. आज प्रशांत दामले हा स्वतःच्या संस्थेमार्फत नाटकांची निर्मिती करताना दिसतोय. अनेक विक्रम व्यावसायिक रंगभूमीवर करून तो विक्रमादित्य कधी झाला हे त्यालासुद्धा समजले नाही.

प्रशांतची नाटकं इथेच नाही तर सातासमुद्रापलीकडे हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे त्यानं त्याच्या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल घेतलेले आहेत. पण आता त्यानं लंडनमध्ये मराठी नाटकाचा झेंडा फडकविलेला आहे. त्याच्या  ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचा दौरा सध्या त्याठिकाणी आहे.

विशेष म्हणजे मँचेस्टरला या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग झाल्यावर प्रशांतला गहिवरून आले. कारण एकच ते हे की,  त्या प्रेक्षकांना एक निखळ विनोदी नाटक पाहण्याचा योग हा प्रशांतमुळेच आला. प्रशांत दामले यांनी जगभर नाटकाचे प्रयोग सादर केले तर तोही विक्रम त्याच्या नावे लागेल आणि त्यावेळी नाटकाचा सिकंदर असेच त्याला म्हणावं लागेल. तो ते लवकरात लवकर मनावर घेईल. अशा या विक्रमादित्याला मानाचा मुजरा.