Sun, Oct 20, 2019 11:32होमपेज › Soneri › सिक्वेलचा भडिमार

सिक्वेलचा भडिमार

Published On: Jul 12 2019 1:39AM | Last Updated: Jul 11 2019 9:56PM
बॉलीवूडमध्ये 1990 च्या दशकात महेश भटचा ‘सडक’ सुपरडुपर ठरला होता. या मसालेदार चित्रपटातील अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स, संगीताने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट यशस्वी ठरल्याने महेश भटची कन्या पूजा भटचादेखील करिअर ग्राफ उंचावला गेला. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येत आहे. महेश भट याच्याकडून आपली लहान कन्या आलिया भटसाठी ‘सडक-2’ची निर्मिती केली जात आहे. बॉलीवूडमध्ये काही महिन्यांनंतर सिक्वेल चित्रपटाचा पूर येणार आहे आणि यात ‘सडक-2’ ने आघाडी घेतली आहे.  सडक-2 मध्ये आलिया आणि आदित्य रॉय कपूर असून हा चित्रपट प्रेमकहाणीवर आधारित असणार आहे. भट यांनी 1990 च्या दशकात एकाहून एक चित्रपट बॉलीवूडला दिलेले आहेत. असे असताना बर्‍याच वर्षांनंतर कमबॅक करताना नवीन स्टोरी घेऊन येण्यापेक्षा सडक चित्रपटाचाच सिक्वेल करण्यास त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते. ट्रेंड पंडित आमोद मेहरा यांच्या मते, अनेक निर्मात्याप्रमाणेच हा एक सेफ साईड गेम आहे. अलिकडे दबंग-2, एबीसीडी-2, स्ट्रिट डान्सर, हाऊसफुल-4, सिंघम-3, आशिकी-3, क्रिश-4, सूर्यवंशी, फिर हेराफेरी यासारख्या सिक्वेलपटांनी चांगले यश मिळवल्याने ज्येष्ठ निर्मातेदेखील यात नशिब आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणात सिक्वेलसाठी निर्मात्यांची स्पर्धा लागली आहे. आजच्याघडीला एखादा चित्रपट हिट ठरला की त्याचा सिक्वेल करण्याची तयारी केली जाते.

मागच्या हिटवर पुढचेही चित्रपट तिकीटबारीवर चांगले यश मिळवतील, असा कयास निर्माते बांधत आहेत. दुसरीकडे श्रोतेही या सिक्वेलवरून संभ्रमात सापडतात. मागच्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटदेखील मनोरंजक असेल, असे गृहीत धरतात.  यादरम्यान निर्माते आणि दिग्दर्शक हे देखील आपला सिक्वेल श्रोते सुपरहिट करतील, असे आडाखे बांधत असतात. बहुतांश निर्माते हे बाजाराची स्थिती पाहूनच अशा प्रकारच्या प्रोजेक्टची घोषणा करत असतात. यामुळे अनेकांना प्रोजेक्ट समजून सांगण्यासाठी अधिक वेळ देण्याची गरज भासत नाहीत. सिक्वेलची घोषणा केल्यानंतर लगेचच हा हिट चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सांगितले जाते आणि नवा चित्रपटही हाऊसफुल्ल ठरेल, असे कयास बांधले जातात. मात्र ‘रेस’ आणि ‘हाऊसफुल’च्या सिरिजमधील अगोदरच्या चित्रपटाचा अनुभव फार चांगला नव्हता.      - सोनम परब