महाभारतात 'देवराज इंद्र' यांची भूमिका साकारणारे सतीश कौल आर्थिक अडचणीत

Last Updated: May 22 2020 3:45PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाभारतमध्ये 'देवराज इंद्र' यांची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या शरीरातील एक हाड फ्रॅक्चर झाल्याने त्यांना चंदिगड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास ३०० हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये सतीश कौल यांनी काम केले आहे. 

सतीश कौल एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, 'मला औषधे, भाज्या आणि आवश्यक वस्तूंसाठा आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. मी इंडस्ट्रीतील लोकांना आवाहन करतो की, मला मदत करावी. मी एक अभिनेता म्हणून मला खूप प्रेम मिळाले आहे. मी एक माणूस असल्याच्या नात्याने माझ्यावर लक्ष देण्याची गरज आहे.'

मीडिया रिपोर्टनुसार, २०११ मध्ये सतीश कौल मुंबईहून पंजाबमध्ये आले होते. त्यांनी पंजाबमधील लुधियाना येथे ॲक्टिंग स्कूल सुरू केले. सतीश म्हणाले, २०१५ मध्ये फ्रॅक्चर झाल्यानंतर मी रूग्णालयात होतो. त्यानंतर मी वृद्धाश्रमात होतो. येथे मी दोन वर्षे होतो.' 

अमेरिकेत आहे पत्नी आणि मुलगा 

सतीश कौल यांची पत्नी आणि मुलगा आर्थिक तंगीमुळे अमेरिकेत गेले. सतीश कौल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी जवळपास २५ वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांच्या कॅन्सर उपचारासाठी मुंबईतील वर्सोवा स्थित फ्लॅट विकला होता. ते म्हणाले की, ॲक्टिंग स्कूलमधून २० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. सरकारकडून त्यांना ५ लाख रुपयांची मदत मिळाली. परंतु, लॉकडाऊनमध्ये त्यांची बिकट परिस्थिती झाली. 

सतीश कौल यांनी हिंदी आणि पंजाबी मिळून ३०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये कर्मा, प्यार तो होना ही था, आंटी नंबर वन या चित्रपटांचा समावेश आहे. सतीश कौल यांनी छोट्या पडद्यावर महाभारतशिवाय टीव्ही मालिका विक्रम आणि वेताळमध्येही काम केले.