तपस्विनी सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी

Last Updated: Dec 11 2019 11:08AM
Responsive image
सुब्‍बुलक्ष्‍मी

स्‍वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन 


'त्यांची' सुंदर बोटे तानपूऱ्यासोबत तारांवर थिरकायची. डोळे बंद करून त्या तानपुऱ्याच्या झंकारित तारांसोबत गायकीच्या विश्वात रमायच्या. त्यानंतर, त्या आपल्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे तानपुऱ्याचा स्वर सोपवायच्या आणि आपलं गायन सुरू करायच्या. दुपारच्या कडक ऊनातदेखील गायकीचा रियाज त्या करायच्या. त्यांनी रियाज केला नाही, असा एकदेखील दिवस गेला नाही. संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या महान व्यक्ती म्हणजे सुब्बुलक्ष्मी. ११ डिसेंबरला त्यांचा स्मृतीदिन. सुब्बुलक्ष्मी यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊया.  

 

केसांच्या मधून पाडलेली भांग, कपाळावर लावलेली गोल मोठी टिकली, त्याखाली लावलेला टिळा, नाकात दोन्हीकडे घातलेली नथणी, कानात घातलेली छोटी फुले (दागिना), स्मितहास्य असं सुब्बुलक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचं तेज. त्यांच्या या सौंदर्याबरोबरच त्यांच्या गायकीतील सुरेल सौंदर्याने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी' अर्थातच एम. एस. सुब्बुलक्ष्मी प्रसिध्‍द गायिका. कुंजम्मा या नावाने त्यांना बालपणी लाडाने बोलवत असत. त्यांची आई अक्कमलाई या प्रसिध्‍द व्हायोलिन वादक होत्या. संगीताचं बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या आईकडूनच मिळालं. 

किशोरी अमोनकर त्यांना 'आठवा सुर' आणि लता मंगेशकर त्यांना 'तपस्विनी' म्हणायच्या. बडे गुलाम अली खान त्यांना 'सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी' म्हणत होते. सरोजिनी नायडू त्यांना 'भारताची स्‍वरकोकिळा' म्हणायच्या. १९४७ मध्ये आलेला चित्रपट 'मीरा'मधून त्या राष्‍ट्रीय पातळीवर चमकल्या. एकदा नेहरू सुब्बुलक्ष्मी यांच्याविषयी म्हणाले होते, 'सुरांची मलिकासमोर मी कोण आहे, केवळ एक पंतप्रधान.'

 

देशातीलच नव्‍हे तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरची ख्‍यातनाम गायिका. गायिकाच नाही तर त्या संगीतकार देखील होत्‍या. व्‍यकंटेश स्तोत्रामुळे त्‍या प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. त्‍यांचे गाजलेले गाणे म्‍हणजे विष्णुसहस्रनाम. त्‍यांचं भक्‍ती संगीत भारतातल्‍या घराघरांत पोहोचलेलं. संपन्‍न घराण्‍यातल्‍या त्‍या गायिका. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. 

वयाच्‍या दहाव्‍या वर्षी त्यांची पहिली मैफिल झाली. पुढे जवळजवळ ७५ वर्षे त्‍यांनी मैफिली केल्‍या. त्‍याचं वैशिष्‍ट्‍ये असं की, साधारणपणे, १९८४-८५च्‍या नंतर त्‍यांनी जाहीर कार्यक्रम मोफत केले. त्‍या-त्‍या संस्‍थेसाठी म्‍हणून त्‍या बिदागी (मानधन) घ्‍यायच्‍या नाहीत. कोट्‍यवधीं रुपयांची मदत त्‍यांनी अनेक संस्‍थांना केली. त्‍यातल्‍या प्रमुख संस्‍था म्‍हणजे, पुण्‍यातील महात्‍मा गांधी ट्रस्‍ट, गांधी स्‍मारक निधी, कस्‍तुरभा स्‍मारक निधी, अशा राष्‍ट्रीय पातळीवरच्‍या संस्‍थांसाठी त्‍यांनी मैफिली केल्‍या. अनेक सार्वजनिक संस्‍थेसाठी त्‍यांनी कार्यक्रम केले. अनेक संस्‍थांना त्‍यांनी मदत केली. तिरुपती बालाजी, चेन्‍नईचा गांधी मेमोरिअल मंडप, हिंदी प्रचार सभा, रामनाथ स्‍वामी मंदिर, अमेरिकेतल्‍या हिंदू मंदिरांसाठी मदत, शाळा आणि महाविद्‍यालये आणि अनेक संगीत संस्‍थांना मदत त्‍यांनी केली होती. 

अनेक थोर गायकांशी त्‍यांचे निकट संबंध होते. बडे गुलाम अली खाँ हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांचा उल्‍लेख करताना 'सुस्‍वरलक्ष्‍मी शुभलक्ष्‍मी' असे करायचे. विलायत खाँ हेदेखील त्‍यांना खूप मानायचे. त्‍यानंतर पंडित रविशंकर, पंडित जसराज, अमजद अली खान यासारखे अनेक मोठे कलावंत त्‍यांचा आदर करायचे. परमेश्‍वरी साधना आणि ईश्‍वरभक्‍ती ही त्‍यांच्‍या गाण्‍यांची वैशिष्‍ट्‍ये. 

 

महात्‍मा गांधी, नेहरू गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. महात्‍मा गांधी यांचं आवडतं भजन 'हरि तुम हरि' हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी गायलं होतं, असे म्‍हटले जाते. नेहरू त्‍यांना आपली मुलगी मानायचे. पंडित नेहरू सुब्‍बुलक्ष्‍मींना म्‍हणायचे, 'तू माझी पहिली मुलगी आहेस आणि इंदू दुसरी.' (इंदिरा गांधी)

इंदिरा गांधी आणि सुब्‍बुलक्ष्‍मी एका कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसल्‍या होत्‍या. राजीव गांधी त्‍यावेळी ४ वर्षांचे होते. त्‍यावेळी कार्यक्रमात राजीव खूपच दंगा करत असल्‍यामुळे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी इंदिराजींच्‍या हातातून राजीव यांना घेतले. त्‍यांना थोपटलं आणि शांत केलं, अशी आठवण सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर एका ठिकाणी बोलून दाखवली होती. नेहरू-गांधी परिवाराशी सुब्‍बुलक्ष्‍मी यांचे संबंध होते. 

असं म्‍हटलं जातं की, त्‍यांचे गाणं-स्‍तोत्र ऐकल्‍याशिवाय लोक कामाला सुरुवात करायचे नाहीत. त्‍यांनी जी गाणी गायली त्‍यात व्‍यकंटेशस्‍तोत्र तर आहेच. शिवाय, त्‍याच्‍यापलीकडे मीरा, तुलसीदास, कबीर, सूरदास आणि तुकारामांचे अभंग (मराठी) अशा थोर संतांच्‍या रचनाही त्‍यांनी गायल्‍या. लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी बंगाली रवींद्र संगीत देखील त्‍यांनी गायले आहे. 

 

अखेरच्‍या काळात त्‍यांनी बिदागी (मानधन) घेऊन त्‍यांनी एकही मैफिल केली नाही. २०० पेक्षा अधिक मैफिली त्‍यांनी सार्वजनिक कार्यासाठी आणि ३ कोटी रुपयांहून अधिक देणग्‍या त्‍यांनी विविध कामांसाठी दिल्‍या. त्‍यांचे पती ‘कल्‍की’ नावाचे साप्‍ताहिक चालवायचे. सुब्‍बुलक्ष्‍मी आणि त्‍यांचे पती यांनी मिळून ‘सावित्री’ हा चित्रपट काढला होता (१९४१). त्‍यात सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी नारदाची भूमिका केली. तर सावित्रीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारली होती.  

दक्षिणेतील लोकप्रिय साप्‍ताहिक कल्‍की नंतरच्‍या काळात तोट्‍यात आलं. आर्थिकदृष्‍ट्‍या तोट्‍यात आल्‍यामुळे त्‍यांनी साप्‍ताहिक बंद केलं. चेन्‍नईत त्‍यांचा 'कल्‍की गार्डन्‍स' नावाचं एक बंगला होता. आर्थिकदृष्‍ट्‍या अडचणीत आल्‍यामुळे त्‍यांनी तो बंगला विकला आणि साध्‍या घरात राहायला गेल्‍या. बंगला विकून त्‍यांनी कामगारांची देणी भागवली.  

'संत मीरा' नावाचा चित्रपट सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी काढला. तो दाखवण्‍यासाठी सुब्‍बुलक्ष्‍मी या दिल्‍लीत पं. नेहरूंच्‍या निवासस्‍थानी गेल्‍या होत्‍या. त्‍या सिनेमाचं स्‍क्रिनिंग नेहरूंसाठी ठेवण्‍यात आलं होतं, असं म्‍हटलं जातं. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपलं संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केलं. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.

 

सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते -

चाकर राखो जी (हिंदी), पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मधुराक्षतम्‌, मोरे आँगना में (हिंदी), मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी), श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌, विष्णुसहस्रनाम, वृंदावन कुंज भवन (हिंदी), हनुमान चालिसा, हरि तुम हरो (हिंदी).

 

पुरस्कार -

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी, संगीत कलाशिखरमणी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॅमन मॅगसेसे पुरस्कार.

११ डिसेंबर २००४ रोजी त्‍यांचं चेन्नई येथे निधन झालं.