Tue, May 30, 2017 04:06
29°C
  Breaking News  


होमपेज › Soneri › चित्रपट परीक्षण

सुखावणारा ‘चि. व चि.सौ. कां.

By pudhari | Publish Date: May 19 2017 1:09PM


गेल्या दीड महिन्यात अगदी मोजकेच मराठी चित्रपट रिलीज झाले असले तरी त्यात दर्जेदार म्हणावे अशी संख्याही नाहीच या पंक्तीत बसेल. अशा स्थितीत  चि. व चि.सौ. कां. हा झी स्टुडिओचा नवा प्रयोग नक्कीच सुखावणारा असाच आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या हरिश्‍चंद्राची फॅक्टरी या चित्रपटानंतर जवळपास पाच वर्षांनी परेश मोकाशी यांनी लहान मुलांच्या विश्‍वात नेणारा एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट केला होता. त्यानंतर हिंदी चित्रपट आणि त्यानंतर झी स्टुडिओ, दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी अशी ही त्रयी चि. व चि. सौ. कां. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा समोर आली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारलेला चित्रपट तुमच्या आमच्या घरातील दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींच्या नात्यातला हळुवार वाढीस लागलेला विश्‍वास दर्शवून जातो. त्यातही दोन भिन्न तत्त्वांना एकत्र आणणारा भन्नाट प्रयोग समाजात वाढत चाललेल्या घटस्फोटांच्या प्रकरणांवर लक्ष तर केंद्रित करतोच पण एकीकडे लिव्ह इन रिलेशनशीपवरही भाष्य करतानाच वृध्दावस्थेत आलेला एकटेपणाही दर्शवतो.  


चित्रपटाची कथा ही सत्यप्रकाश आणि सावित्री या प्राणिप्रेमी आणि पर्यावरणप्रेमीवर आधारित आहे.  सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर व पराकोटीची प्राणीप्रेमी तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रीकल इंजिनियर व टोकाचा पर्यावरण प्रेमी. घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात व एकमेकांना पाहतात देखील. त्या दोघांचे मित्र असलेले आणि प्रेमात आकंठ बुडालेले हे एक जोडपे त्यांच्याच साक्षीने विवाहबध्द होते आणि महिन्याभरातच एकमेकांना वैतागून वेगळेही होतात.


योगायोगाने  सत्यप्रकाश तिला पहायला येतो. यावेळी व्हेजीटेरियन असलेली सावित्री लग्नाअगोदर सत्यप्रकाशच्या घरी रहायचे असल्याचे सांगते.  यामुळे लग्नच न करण्या निर्णय घेतलेल्या सत्यप्रकाशला तिचा निर्णय पटतो पण त्यांच्या कुटुंबियांची मात्र भंबेरी उडते. हा मजेशीर गोंधळ मात्र चित्रपटात पहाणेच योग्य ठरेल. या चित्रपटात घरातील भावंडांमधील भांडणे असोत किंवा आई वडिलांची मुलांच्या लग्नाबद्दल असलेली काळजी असो हे सगळं आपल्याच घरात घडत असल्यासारखे भासत रहाणे हे दिग्दर्शकाचे आणि संकलकाचे कौशल्य म्हणावे लागेल.


  लेखिका मधुगंधाच्या लेखणीत नावीन्य तर आहेच परंतु अनेक सामाजिक विषयांवरही भाष्य केले आहे. चित्रपटाची कास्टिंगही अगदी परफेक्ट अशीच आहे. सत्यप्रकाशच्या भूमिकेत  ललित प्रभाकर आणि सावित्रीच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले अगदी साजेशी असून त्यांचा अभिनयही अगदी कसलेला असाच वाटतो. त्यातल्या त्यात ललितचा पहिला चित्रपट असूनही त्याच्या भूमिकतेला प्रत्येक बारकावा अत्यंत व्यवस्थित मांडलेला दिसून येतो आणि मृण्मयीची कुंग-फूवरील मेहनतही दिसून येते. चित्रपटात लक्ष वेधून घेतो तो सावत्रीच्या भावाची भूमिका साकारणारा पुष्कर लोणारकर. यात खटकते ती भारत गणेशपुरेची लुडबुड जी नसती तर चित्रपटाची लय मध्येच तुटली नसती असे वाटते.