Tue, Nov 19, 2019 05:49



होमपेज › Soneri › ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’; दिमाखदार मुहूर्त

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’; दिमाखदार मुहूर्त

Published On: Mar 08 2019 7:15PM | Last Updated: Mar 08 2019 7:15PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतीतून जगण्याचे वेगवेगळे पदर उलगडले आहेत. चित्रपटगृहाबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकाला सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर देत सत्य घटनेवर प्रेरित अमेरिकेत घडणारी ही कथा आहे. या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाची निर्मिती होत असून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे चित्रित होणारा मराठीतला हा पहिला हॉलिवूड चित्रपट ठरणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने कलाक्षेत्राला चांगल्या कथेचा सुखाचा ठेवा देण्यासाठी चित्रपटाचे निर्माते शिवकुमार आणि संवेदनशील दिग्दर्शिका समृद्धी पोरे हे एकत्र आले आहेत. छोट्या पडद्यावर आपल्या अनेक दर्जेदार कलाकृतींनी वेगळे स्थान निर्माण करणारे निर्माते–दिग्दर्शक गजेंद्र सिंग या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मराठी रुपेरी पडद्यावरचा डॅशिंग हिरो अंकुश चौधरी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून अनेक ग्लॅमरस असलेली झीनल कामदार यात नायिकेच्या भूमिकेतून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

‘वेगळ्या प्रयोगाचा तसेच नावाजेल्या निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त करतानाच ‘सुखातील समाधान की समाधानातलं सुख’ हे अधोरेखित करून दाखवणारा हा चित्रपट प्रत्येकाला निखळ आनंद देईल’, असा विश्वास चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांच्या कथेतील सच्चेपणा भावला असे सांगत संगीताच्या माध्यमातून दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानतर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीशी जुळणारा स्नेहबंध माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याचे गजेंद्रसिंग यांनी सांगितले.तसेच एक चांगली कथा मराठी प्रेक्षकांसाठी आणल्याचे समाधान निर्माते शिवकुमार यांनी व्यक्त केले आहे. 

‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे खरे सुख’ असे सांगत, हा चित्रपट हसू आणि सुख तुम्हाला निश्चितच देईल, असा विश्वास अभिनेता अंकुश चौधरी यांनी व्यक्त केला. तर पदार्पणातच मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद अभिनेत्री झीनल कामदार हिने व्यक्त केला.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे महिन्याच्या अखेरीस लॉस एंजलिस येथे सुरुवात होणार आहे.