Thu, Jun 27, 2019 18:01होमपेज › Solapur › अधिर मन झाले...

अधिर मन झाले...

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:06PMअधिर मन झाले, मधूर घन आले.. ‘नीळकंठ मास्तर’ या चित्रपटातील गीत सगळ्यांच्या ओठावर कधीना कधी येते. हे गीत ही सर्वांना परिचित आहे. आज जिल्हा परिषद शिक्षण विभागात पिंजर्‍यात अडकलेले काही गुरुजी अजूनही नीळकंठ मास्तरांच्या भूमिकेत दिसून येत असल्याने जिल्हा परिषदेचे हेडमास्तर डॉ. राजेंद्र भारुड यांना हातात छडी घेऊन पिंजर्‍यात अडकलेल्या अनेक महिने गैरहजर राहणार्‍या दांडी बहाद्दर शिक्षकांना बडतर्फ करावे लागले. बडतर्फ करण्यात आलेले सर्वच शिक्षक पिंजर्‍यातील आहेत, असे नाही,  बडतर्फ करण्यात आलेल्या शिक्षकांशिवायही अजूनही अनेक शिक्षक पिंजर्‍यात अडकलेले आहेत, त्यांच्यावरही आज ना उद्या छडी उगारण्याची वेळ येणार आहे, हे मात्र निश्‍चित आहे. 

गुरुजी म्हणजे माता-पित्यानंतरचे आदरणीय व पूज्य असे स्थान.आई-वडिलांनतर जर कोणावर डोके टेकवावे वाटले तर प्रत्येक यशस्वी मनुष्य गुरुजींच्या पायावर आपले डोके टेकवून नतमस्तक होतो. अलीकडच्या तीस वर्षांत गुरुजींचा तो दरारा व आदरयुक्‍त भीती केंव्हाच काळाच्या पडद्याआड गेली असल्याचे दिसून येते. गुरुजीचे शिक्षक व सर कधी झाले याचा पत्ता लागला नाही. त्यावेळच्या गुरुजींना शे पाचशे रुपये पगार मिळायचा, पण त्या काळात गुरुजींच्या हातात तयार झालेली व आज उतार वयात असणारी ती पोरं संगणक व कॅलक्युलेटरशिवाय गणित सोडवू शकतात. इतकेच नव्हे तर प्राथमिक शिक्षणाच्या मजबूत पायाच्या जोरावर ही मुलं इंग्रजीतही तरबेज असलेली दिसून येतात. आज ई-लर्निंग, संगणक, प्रोजेक्टर प्रॅक्टीकल बुक आदीची सुविधा असतानाही मुलांच्या डोक्यात मात्र काहीच राहत नसल्याचे अनेकदा दिसून येते. अलीकडच्या दहा वर्षांत नियुक्‍त झालेले काही तरुण शिक्षक मात्र चांगले काम करीत असताना दिसतात. मात्र दोनपेक्षा जास्त वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ घेणारे काही गुरुजी आजही शाळेवर न जात नाहीत अशी चर्चा आहे. काही गावात तर काही राजकीय पुढार्‍यांनी जुगाराचे अलिशान अड्डे तयार करून अशा काही गुरुजींना दिवस व रात्र याठिकाणी घालविण्याची सोय केली आहे. या गुरुजींना येथे जागेवरच सगळे काही मिळते, शिवाय जागेवरून हळूहळू त्यांची मालमत्ता कमी होत असल्याचेही दिसून येते. अनेक शिक्षकांना आज तीस हजार व चाळीस हजार रुपयांच्या दरम्यान दरमहा वेतन मिळते. काही कुटुंबात तर दोघेही नवरा बायको शिक्षक असून दरमहा लाख रुपयांपर्यंत लक्ष्मी घरात येत असताना, विविध प्रकाराच्या सवयीमुळे अशा घराचे वासे फिरत असल्याचे दिसून येते. मुलांसाठी तर ही बाब भविष्यासाठी घातक आहे, पण गुरुजींच्या कुटुंबासाठीही ही बाब अत्यंत घातक आहे. मद्य प्राशन करून शाळेत जाणार्‍या शिक्षकांची संख्या नजरेत भरणारी आहे. हव्या त्याठिकाणी बदली करून घेणे, शाळेत दांडी मारून पगार काढून घेण्यातच अनेक शिक्षक तरबेज असल्याचे दिसून येतात. जिल्हा परिषदेतील व पंचायत समितीमधील कोणतीही यंत्रणा अशा शिक्षकांवर नियंत्रण ठेवणारी नाही, त्यामुळे अशा शिक्षकांचे कृत्य वाढत आहेे. शिक्षकांची संख्या कमी असल्याने वर्षभरात डॉ. भारुड यांनी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून हातात छडी घेतली नव्हती, पण आता मात्र त्यांनी छडी हातात घेतल्याने अशा गुरुजींची काही खैर नाही.