Thu, Jul 18, 2019 13:01होमपेज › Solapur › जि.प. घरकुल जागा खरेदी योजनेला हरताळ! 

जि.प. घरकुल जागा खरेदी योजनेला हरताळ! 

Published On: Sep 11 2018 11:02PM | Last Updated: Sep 11 2018 9:50PMसोलापूर ः संतोष आचलारे

ग्रामीण भागातील बेघर असणार्‍या कुटुंबांना घरकुल योजनेसाठी जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येते. यासाठी शासनाने सोलापूर जिल्हा परिषदेला मागील तीन वर्षांत 606 बेघरांना जागा खरेदी करुन देण्यासाठी निधी दिला होता. जिल्हा परिषदेने मात्र आतापर्यंत केवळ 31 लाभार्थ्यांनाच घरकुलासाठी जागा मिळवून देण्यासाठी निधी दिला आहे. त्यामुळे घरकुल योजनेत राज्यभरात नंबर वनवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या या कामगिरीने त्यांच्या कार्यावर पाणी फिरत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचा निर्धार केला आहे. या योजनेसाठी सातत्याने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने या योजनेचा आढावा घेत या योजनेला गती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

ग्रामीण भागातील बेघर  कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून दीड लाख रुपयांपर्यंत घरकुलासाठी अनुदान देणे, ज्या कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना बाजारमूल्याप्रमाणे गावातच जागा मिळवून देेण्यासाठी कमाल 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य करण्याची योजना तीन वर्षांपासून सुरु केली आहे. 

या योजनेतून ग्रामीण भागातील 552 अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट होते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील 12 लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट होते. इतर प्रवर्गातील 42 लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी केवळ आतापर्यंत सर्व प्रवर्गांतील मिळून 25 लाभार्थ्यांनाच घरकुलासाठी 10 लाख 41 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टासाठी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेस 1 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर  आहे. 

या निधीतून केवळ आतापर्यंत 10 लाख 41 हजार रुपयांचाच लाभ जागा खरेदीसाठी लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला या योजनेत सपशेल अपयश आले असून लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेत येऊन नेमके काम तरी काय करतात, त्यांचे प्रशासनावर नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जागा खरेदीला अनुदान मिळण्यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र जागा खरेदी करुन देण्यासाठी तालुकास्तरीय असलेल्या समितीचे कामच भूमिगत झाले असून यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ‘देव देते अन् कर्म नेते’ अशीच गत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांची झाली आहे. जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य निर्माण झाले आहे. 

जागा खरेदी करण्यासाठी 50 हजारांपर्यंत अनुदान देण्याची मर्यादा असतानाही अनेक लाभार्थ्यांना 15 ते 20 हजार रुपयांचीच मदत देण्यात आल्याने या योजनेला चांगलाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.