Mon, Jul 13, 2020 16:40होमपेज › Solapur › जिल्हा बँकेने जमा केले 117 कोटी

जिल्हा बँकेने जमा केले 117 कोटी

Published On: Dec 01 2017 11:16PM | Last Updated: Dec 01 2017 11:14PM

बुकमार्क करा

सोलापूर : महेश पांढरे  


राज्य शासनानेे जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असणार्‍या जवळपास 22 हजार शेतकर्‍यांच्या नावे 117 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आजतागायत 208 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्‍कम ज्या शेतकर्‍यांची कर्जे दीड लाख रुपयांपर्यंतची आहेत, त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शेतकर्‍यांच्या याद्या पडताळून ही रक्‍कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. जवळपास 37 हजार शेतकर्‍यांच्या याद्या पडताळण्यात आल्या असून, त्यापैकी 5 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. तर आजपर्यंत 22 हजार शेतकर्‍यांच्या खात्यांवर जवळपास 117 कोटी रुपये जमा करण्यात बँकेला यश आले आहे. तर जिल्हा बँकेकडील 6 हजार शेतकरी हे नियमित कर्जदार असून ते वेळेवर कर्ज फेडत आहेत. त्यामुळे अशा सहा हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचेही बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. तर 38 कोटी रुपये हे ज्या शेतकर्‍यांचे कर्ज पुनर्गठित करण्यात आले आहे, अशा शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.त्याचीही पडताळणी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. तर दीड लाख रुपयांच्यावरती कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांनी ओटीएस अर्थात एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांचे कर्ज दीड लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकर्‍यांनी येत्या 30 डिसेंबरपर्यंत उर्वरित रक्‍कम भरून घ्यावी, अन्यथा त्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही, असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असले तरी त्याबाबतच्या सूचना अद्याप आल्या नसल्याचे जिल्हा बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले आहे.