होमपेज › Solapur › नुकसानभरपाईच्या कारणातून टेंभुर्णीत तरुणाची आत्महत्या

नुकसानभरपाईच्या कारणातून टेंभुर्णीत तरुणाची आत्महत्या

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:49PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

गाडीची काच फोडली म्हणून मारहाण केली व नुकसानभरपाई मागितली म्हणून एकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून टेंभुर्णी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास टेंभुर्णीतील इंदिरानगर झोपडपट्टीत घडली आहे.

याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या घटनेतील बंडू विलास पवार (वय 35, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, टेंभुर्णी) याने शेजारी राहणार्‍याच्या गाडीची शनिवारी रात्री 11 वाजता काच फोडली होती. यावरून समाधान विलास थोरात (28) व प्रशांत बबन थोरात (20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी) यांनी काच का फोडली म्हणून व नुकसानभरपाई द्या म्हणून बंडू पवार यास मारहाण केली होती. तसेच रविवारी सकाळी 9 वा. सुमारास पुन्हा नुकसानभरपाई द्या म्हणून भांडण केले. यामुळे बंडू पवार याने घाबरून अंगावर रॉकेल ओतून घेतले. यात तो भाजून गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात बंडूचे वडील विलास कोंडिबा पवार (वय 70) यांनी फिर्याद दिली. विलास पवार यांच्या फिर्यादीवरून समाधान थोरात व प्रशांत थोरात यांच्याविरोधात आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.