सोलापूर : पुढारी ऑनलाईन
सकल मराठा समाजाच्यावतीने १० जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद करण्यात आल्याची पोस्ट फेसबुकवर टाकणार्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बझार पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केले आहे. विशाल प्रकाश सातपुते (वय २१, रा. पाटकूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर सध्या शिरगिरे बिल्डींग, डफरीन चौक, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस आयुक्तालयाच्या सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फेसबुकवर भीमा कोरेगाव या ठिकाणी निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नानंतर मराठा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी १० जानेवारी २०१८ रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. फेसबुकवरील ही पोस्ट कोठून व कोणी टाकली याचा सायबर सेलकडून शोध घेतला असता ती पोस्ट विशाल सातपुते याने प्रसिध्द केल्याचे दिसून आले. त्यामुळे सायबर सेल विभागाच्यावतीने सातपुते यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केल्याचे सांगितले. त्यामुळे सातपुते याने जनतेमध्ये भिती निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपुते यास अटक करण्यात आली आहे. याबाबत महिला पोलिस उपनिरीक्षक भास्कर अधिक तपास करीत आहेत.
वाचा संबंधित :
उद्या ‘महाराष्ट्र बंद’ नाही
‘कोरेगाव-भीमा’ची पाळेमुळे खणून काढू : मुख्यमंत्री
भिडे गुरुजींबद्दल तोंड सांभाळून बोला : खा. उदयनराजेंची तंबी