Tue, Jul 16, 2019 23:57होमपेज › Solapur › बार्शी येथे ‘हात मदतीचा, ध्यास प्रगतीचा उपक्रम’

बार्शी येथे ‘हात मदतीचा, ध्यास प्रगतीचा उपक्रम’

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 8:40PMबार्शी : गणेश गोडसे

ज्या समाजात आपण जन्मास आलो आहोत, त्या समाजाप्रती, समाजातील गरजूंसाठी आपापल्या परीने मदत करून त्यामध्ये समाधान मानणारी काही माणसे समाजात असतात. बार्शी येथील काही तरूणांनी याच उद्देशाने एकत्रित येत चक्क सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील गरजू व शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोठी आर्थिक रक्कम व वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, खोडरबर आदी साहित्य संकलित केल्याचा एक विद्यार्थी कल्याणाचा उपक्रम राबवला आहे.

बार्शी येथील संदीप पवार, अजय तोरड, बाळू देवधरे, सागर खराडे, अक्षय घोडके, अमित सावंत, गणेश वाघमारे, महेश बकशेट्टी, ओंकार चव्हाण, शेखर देशमुख, गौरव साठे, बालाजी देशमुख, रामदास भाकरे या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरूणांनी हा समाजोपयोगी अनोखा उपक्रम राबवला आहे.

फेसबुक या सोशल मीडियावर ‘हात मदतीचा, ध्यास प्रगतीचा’ या अनोख्या उपक्रमांतर्गत समाजामधील सक्षम लोकांकडून शैक्षणिक साहित्य घेऊन समाजातील गरजवंतांपर्यंत पोहचवण्याचे काम हे तरुण करीत आहेत. 

अल्पावधीतच केवळ फेसबुकच्या माध्यमातून या तरुणांनी क्रांती घडवत आत्तापर्यंत 40 हजार रुपये रोख, 749 वह्या, 136 चित्रकला वही, 292 पेन्सिल, 32 डझन स्केच पेन, 514 बॉल पेन, 62 स्केल, 392 खोडरबर, 220 शार्पनर, स्कूल बॅग 6, कंपास बॉक्स 109, रायटिंगपॅड 25, वॉटर बॉटल 74 असे 15 हजारांचे शालेय साहित्य संकलित करण्यात यश मिळवले आहे. 

गत काही दिवसात ठिकठिकाणी सुरू असलेल्या ‘आहे ते द्या, नाही ते घेऊन जावा’ या ‘माणुसकीची भिंत’ या संकल्पनेच्या धर्तीवर गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांसाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी मोहीम राबवावी, ही विचारधारा जपत तरूणांनी एकत्रित येत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या बार्शी शहराबरोबरच देश, परदेशातील अनेकांनी या उपक्रमाला मदत केली आहे. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी शिक्षणाचा असल्यामुळे व  या तरुणांची धडपड पाहून काही दाते ऑनलाईनद्वारे पैसे पाठवत आहेत.   बार्शी तालुक्यातील जवळपास 116 जिल्हा परिषद शाळांची माहिती या तरूणांनी संकलित करून येथील खरोखर गरजवंत कोण याची चाचपणी केली जात आहे. लवकरच गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार करून अवघ्या काही दिवसांमध्ये ही मदत विद्यार्थ्यांना पोच केली जाणार आहे. अजूनही मदत स्वीकारली जात आहे.