Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Solapur › कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:42PMशिराढोण : प्रतिनिधी

पावसाने महिन्याभरापासून दडी मारल्याने झालेले पिकांचे नुकसान, त्यामुळे बँक व महामंडळाचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकरी कुटुंबातील तरुणाने आत्महत्या केली. वडगाव (ता. कळंब) येथे ही दुर्दैवी घटना घडली. अशोक बनसोडे असे या शेतकर्‍याचे नाव आहे. तो गेल्या पंधरा दिवसांपासून नैराश्येच्या गर्तेत होता. बुधवारी (दि.15) अशोक आपल्या बहिणीकडे बार्शीला जातो असे सांगून घरातून गेला.

अशोक बनसोडे याच्या कुटुंबात आई, वडील, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. लहान भाऊ खंडूचे शिक्षण होऊनदेखील त्याला नोकरी नाही. वडिलांच्या नावावर साडेचार एकर जमीन. स्टेट बँकेचे व चर्मकार महामंडळाचे कर्ज. सर्व उपजीविका शेतीवर. पिकाला एक महिन्याची पावसाने दिलेली ओढ, सततचा दुष्काळ, नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे व वर्षभर कौटुंबिक खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून अशोक बनसोडे या तरुणाने स्वत:चे शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शुक्रवारी (ता. 17) शेतात मृतदेह दिसून आला.

दरम्यान, शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून वडगाव (नि.) येथे अशोक बनसोडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिराढोण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख करत आहेत.