Fri, May 29, 2020 04:24होमपेज › Solapur › सोलापूर : आडम मास्तरांना कामगारांकडून १ लाखाचा हार

सोलापूर : आडम मास्तरांना कामगारांकडून १ लाखाचा हार

Published On: Sep 18 2019 8:22PM | Last Updated: Sep 18 2019 8:22PM
सोलापूर : प्रतिनिधी 

माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांना कामगार व कार्यकत्‍र्यांकडून 1 लाख एक रूपयांचा नोटांचा हार घालण्यात आला. बुधवारी पोलिस मुख्यालय समोरील अचिव्हर्स हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी नेते अशोक इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्‍या मेळाव्यात कार्यकर्त्याकडून  आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार पक्‍का केला.

यावेळी अशोक इंदापुरे म्हणाले की, कॉ. आडम मास्तर हे कोणीही कोणतेही काम व जटील समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले असता, त्यांची जात, भाषा, धर्म पक्ष न पाहता ते कामाला लागतात. एसबीसी प्रश्न सोडवल्यामुळे कित्येक पद्मशाली विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. याचे श्रेय आडम यांना जाते.

या नंतर आडम मास्‍तरांनी बोलताना मी आमदारकीसाठी विधानसभा निवडणूक लढवत नाही, तर गोर गरीब कष्टकरी, पीडित, कामगार यांच्या व्यथा वेदना मांडण्यासाठी लढवणार असल्‍याचे सांगितले.

या देशात 370 कलमाबाबत सरकारच्या दहशतीविरुद्ध टाहो फोडणारे एकमेव पक्ष हा लाल बावट्याचा आहे. आणखी किती दिवस सोलापूर स्मार्ट सिटीच्या नावाने शहराचे विद्रुपीकरण करता? मुबलक पाणी द्या, इथल्या स्थानिक आमदारांनी माझ्या नावाने पार विधानसभेपर्यंत खोटी तक्रार करून बदनामीचे षड्यंत्र रचले. यंदा याला कामगार कष्टकरी जनता मतपेटीतून उत्तर देतील. मी कष्टकरी जनतेच्या घरांसाठी उचलले शिवधनुष्य पेलणार याचा निर्धार केलेला आहे. मी माझे आयुष्य श्रमिकांसाठी समर्पित करीत आहे.

शहरात युवकांच्या हाताला काम देण्याची हमी त्‍यांनी यावेळी दिली. आज विरोधकांना नमावण्यासाठी सर्व कष्टकरी जनतेने मला जवळजवळ तीस लाख रूपयांचा निधी सुपूर्द केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या निवडणुकीत आपण कोणत्याही भूलथापांना, अफवांवर विश्वास ठेवू नका श्रमिकांचा आवाज विधानसभेत पाठवा असे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर माकपचे सचिव मंडळ सदस्य नगरसेविका कामीनीताई आडम, माजी नगरसेविका नासीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, शेवंताताई देशमुख, सुनंदाताई बल्ला, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माशप्पा विटे, कुरमय्या म्हेत्रे, युसूफ शेख मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी, प्रा अब्राहम कुमार, रंगप्पा मरेड्डी तसेच महादेव घोडके, मुरलीधर सुंचू, सलीम मुल्ला, दीपक निकंबे, शंकर जाधव, हणमंतू जंगम,अब्दुक हमीद हिरापूरे, डॉ उस्मान खान, महिबूब कुमठे,अशोक तांबोलू,अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघम चे अध्यक्ष डॉ व्यंकटेश गड्डम पंतुलु,वेणुगोपाल जिल्ला कानेपागुल पास्टर आदी उपस्थित होते.