होमपेज › Solapur › महिलेचा खून करणार्‍यास अटक

महिलेचा खून करणार्‍यास अटक

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 9:15PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

मुलाच्या प्रेमविवाहाला विरोध असतानाही मुलीच्या आईने विवाह करून दिल्याचा राग मनात धरून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी एका वृद्धास अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

सिद्राम महादेव गायकवाड (वय 65, रा. बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सुनीता सुरेश कांबळे (42, रा. बक्षी हिप्परगा) असे खून  झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत उमेश सुरेश कांबळे (24) याने दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर  तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायकवाड याचा मुलगा  सागर आणि सुनीता कांबळे हिची मुलगी राणी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला. या विवाहास गायकवाड याचा विरोध  होता. परंतु, सुनीता कांबळे हिने गायकवाड याच्या विरोधास न जुमानता दोघांचे लग्‍न लावून दिले होते. त्यामुळे गायकवाड याच्या मनात सुनीताबद्दल राग होता.

याच रागाच्याभरात बुधवारी दुपारी सुनीता एकटी असताना तिला रेवू लमाण याच्या शेतात गाठून गायकवाड याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी करून ठेचून मारले. बुधवारी रात्री सुनीताचा मृतदेह मिळून आल्यानंतर याबाबत सोलापूर तालुका पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. गुरुवारी सकाळी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी बक्षी हिप्परगा येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व तपास केला. त्यावेळी सुनीता कांबळे हिचा खून सिद्राम गायकवाड याने केल्याचे कबूल केले.