Fri, Feb 22, 2019 22:23होमपेज › Solapur › सीना नदीत महिलेचा बुडून मृत्यू

सीना नदीत महिलेचा बुडून मृत्यू

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 25 2018 1:21AMमाढा : वार्ताहर

दारफळ (सीना, ता. माढा) येथे सीना नदीपात्रात आंघोळीसाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने महिला बुडून मृत झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

उज्ज्वला मारुती खोटे (वय 45) असे बुडून मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत उज्ज्वला या अधिक मासानिमित्त गावातील इतर महिलांसोबत आंघोळीसाठी गेल्या होत्या. सीना नदीत सध्या उजनी धरणातून भीमा सीना जोडकालव्यातून पाणी सोडले आहे. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने उज्ज्वला या पाण्यात बुडून मृत झाल्या. स्थानिकांच्या मदतीने पोलिस व महसूल प्रशासनाने मृताचा नदीपात्रात शोध घेतला असता बुडालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आला. मृत उज्ज्वला यांच्या पश्‍चात पती व दोन मुले आहेत. घटनास्थळास माढ्याचे तहसीलदार एम. पी. मोरे, सपोनि अतुल भोस यांनी तातडीने भेट दिली.