होमपेज › Solapur › न्यायालयात आरोपींकडून साक्षीदाराला धमकी

न्यायालयात आरोपींकडून साक्षीदाराला धमकी

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:32PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

साक्ष देण्याच्या कारणावरून कोर्टाच्या  व्हरांड्यात  दोघा आरोपींनी साक्षीदाराला  ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध जेलरोड पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली. गेल्या काही दिवसांपूर्वी एका साक्षीदाराने वकिलाला मारहाण केल्याची घटना घडली असताना आता आरोपींकडूनच साक्षीदाराला धमकी दिल्याची घटना घडली आहे.

मुत्याप्पा  शांतप्पा  बिराजदार  (वय 40, रा. मोदी, सोनीनगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सादिक सलीम शेख आणि तौफिक सलीम शेख (रा. दक्षिण सदर बझार, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सादिक शेख व तौफिक शेख यांच्याविरुद्ध   प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मेस्त्री यांच्या कोर्टात खटला सुरू आहे. या खटल्यात सोमवारी दुपारी मुत्याप्पा बिराजदार हे कोर्टात साक्ष देऊन कोर्ट हॉलमधून बाहेर आले. त्यावेळी बिराजदार यांना सादिक शेख व तौफिक शेख या दोघांनी तू आमच्याविरुद्ध साक्ष का दिलीस, तू कोर्टाला माझ्यासमोर मोटारसायकल जप्त केली नाही असे खोटे सांग, नाही तर तुला बाहेर आल्यानंतर खल्लास करून टाकीन असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. 

त्यामुळे बिराजदार यांनी जेलरोड पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल  केली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय  कोळेकर तपास करीत आहेत.