Tue, Jul 23, 2019 02:16होमपेज › Solapur › बदल्यांचे प्रस्ताव पाठवले नाहीतच!

बदल्यांचे प्रस्ताव पाठवले नाहीतच!

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 10:38PMसोलापूर : प्रतिनिधी

बदल्यांचा कालावधी नाही, कर्मचार्‍यांनी बदल्यांसाठी विनंती अर्ज केले नाहीत, तरी त्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याविरोधात अन्याय झालेले कर्मचारी न्यायालयात गेले आहेत. याप्रकरणी उपसंचालकांनी संचालकांना ‘त्या’ बदल्यांचे प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडून पाठवले नाहीत, असे लेखी पत्राव्दारे सांगितले आहे.

घडलेला प्रकार असा की, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील वर्ग 3 मधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे प्रस्ताव नियुक्ती अधिकारी तथा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी संचालकांकडे पाठवणे गरजेचे आहे. मात्र बदल्यांचा कालावधी नाही आणि कर्मचार्‍यांचे विनंती अर्जही आले नाहीत. त्यामुळे उपसंचालक डॉ. देशमुख यांनी बदल्यांचे प्रस्ताव संचालकांना पाठवले नाहीत. असे असताना तत्कालीन संचालक डॉ.सतीश पवार आणि उपसचिव डॉ. संजय मोरे यांनी 15 नोव्हेंबर 2017 रोजी  कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये उपजिल्हा रूग्णालय, अकलूज येथील वरिष्ठ लिपीक मनिषा नागेश बंदपट्टे, जिल्हा क्षयरोग कार्यालयातील वरिष्ठ लिपीक माणिक नागनाथ कदम, डॉ. बंदोरवाल हॉस्पिटल, पुणे येथील वरिष्ठ लिपीक बी. आर. मेरगू आणि जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, सोलापूर येथील वरिष्ठ लिपीक वाय. आय. शेख यांचा समावेश आहे. 

या चुकीच्या व अन्यायकारक बदल्यांविरोधात यातील कनिष्ठ लिपीक वाय. आय. शेख आणि माणिक कदम हे औद्योगिक न्यायालयात गेले आहेत. यावर वरिष्ठ कार्यालयास न्यायालयाने म्हणणे सादर करावयास सांगितले आहे. परंतु दोन सुनावण्या झाल्या तरी वरिष्ठ कार्यालयाकडून म्हणणे सादर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील तारीख सुनावणीसाठी दिली आहे. मात्र याप्रकरणी उपसंचालकांनी संचालकांना या बदल्यांचे प्रस्ताव पाठवले नसल्याचे लेखी पत्र पाठवले आहे.

 

tags : solapur, solapur news, transfer of state government employee, illegal transfer,