Tue, Jul 07, 2020 12:05होमपेज › Solapur › सांगोला सूतगिरणीला  कर्जपुरवठ्याबाबत परवानगी देणार : मुख्यमंत्री

सांगोला सूतगिरणीला  कर्जपुरवठ्याबाबत परवानगी देणार : मुख्यमंत्री

Published On: Dec 19 2017 11:19PM | Last Updated: Dec 19 2017 11:19PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील सांगोले शेतकरी सहकारी सूतगिरणीला कर्जपुरवठ्याबाबत पंढरपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीला शासनाकडून परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

सूतगिरणीच्या प्रश्नांबाबत विधानमंडळाच्या मंत्रिपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सहकार, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, आमदार गणपतराव देशमुख, आमदार जयंत पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वस्त्रोद्योग अपर मुख्य सचिव उज्ज्वल उके आदी उपस्थित होते.

दुष्काळी भागातील ही सूतगिरणी सातत्याने चांगली चालत आली आहे. या ठिकाणी ९०० हून अधिक कामगार आहेत. तथापि, अलीकडे संचित तोट्यामुळे सूतगिरणीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १२ कोटी कर्जाची मागणी बँकेकडे केली आहे. या कर्जपुरवठ्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे. ती मिळावी, अशी मागणी आमदार श्री. देशमुख यांनी यावेळी केली.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या सूतगिरणीला कर्जपुरवठा करण्याबाबत या बँकेला शासनाकडून आवश्यक परवानगी दिली जाईल. बँक विहित पद्धतीने नियमानुसार सूतगिरणीला कर्जपुरवठा करु शकेल.’’

मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.