Thu, Jul 16, 2020 08:23होमपेज › Solapur › फिर्यादी पतीच निघाला खुनी

फिर्यादी पतीच निघाला खुनी

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:29PM

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी

पत्नीचा खून करून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसर्‍याला गुंतवण्याचा प्रकार करमाळा पोलिसांनी उघड केला असून खुनाच्या गुन्ह्यात विनाकारण अटक झालेल्या एकाला पोलिसांनी गुन्ह्यातून दोषमुक्‍त केले, तर फिर्यादी असलेल्या आरोपीची तुरुंगात रवानगी केली. 

प्रकाश ऊर्फ टरलिंग काळे (वय 26, रा. भगतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महादेव संभाजी गिरंजे (वय 56, रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे गुन्ह्यातून मुक्‍त केलेल्याचे नाव आहे. लताबाई प्रकाश काळे (वय 30, रा. भिलारवाडी) या महिलेचा खून झाला होता.

या रहस्यमय खुनाची घटना 13 सप्टेंबर रोजी भिलारवाडी येथील महादेव संभाजी गिरंजे यांच्या घरासमोर घडली होती. याबाबतची फिर्याद प्रकाश काळे याने दिली होती.

गुन्ह्याचा घटनास्थळ हा आरोपीच्या घरासमोर नसून मकाई कारखाना ते भिलारवाडी रोडवरील पिंपळाच्या झाडाजवळ भागवत वालेकर यांच्या पिठाच्या गिरणीसमोर असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मूळ फिर्यादी काळे याने बनाव करून महादेव गिरंजे यांनी पैशाच्या कारणाने पत्नी लताबाई हिला लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे सांगितले होते. तपासलेल्या 14  साक्षीदारांमधून घटनास्थळ वेगळे निष्पन्न झाले होते. लताबाई व प्रकाश हे दोघे पती-पत्नी असून दोघांचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते. यावेळी प्रकाश काळे याने पत्नी लताबाई हिस बेदम मारहाण करून तिला गंभीर जखमी केले होते. तिला उपजिल्हा रुग्णालयात व नंतर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान लताबाई मृत झाल्या. 

या प्रकरणात स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेबूब शेख, महमद रफिक पटेल, प्रदीप पर्वते आदींनी तपास करून खरा आरोपी उघड केला आहे.