Tue, Apr 23, 2019 08:07होमपेज › Solapur › सर्व साखर कारखान्याचे वजन काटे निर्दोष

सर्व साखर कारखान्याचे वजन काटे निर्दोष

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:15PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू असून जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीम मोहीम हाती घेण्यात आली. सर्वच साखर कारखान्यांचे वजन काटे निर्दोष असल्याचा निर्वाळा वैद्यमापन विभागाचे अधिकारी देत फिरत आहेत.

यंदा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर वजन काट्यासंदर्भात शेतकरी संघटनांनी तक्रारी  केली होती. सर्व वजन काटे ऑनलाईन करावेत आणि त्यांची अचानक तपासणी करावी, अशीही मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी  वैद्यमापन विभागाच्या भरारीपथकामार्फत जिल्हयातील सर्वच कारखान्यांच्या वजन काट्यांची अचानक तपासणी करण्यात येत आहे. 
माळशिरस तालुक्यातील पांडूरंग सहकारी, माळीनगर शुगर्सची तपासणी केल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी , विठ्ठल सहकारी, मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन,  भैरवनाथ शुगर्स या कारखान्यांच्या वजन काट्याची पाहणी केली असता, वैद्यमापन विभागाने पूर्वी केलेले सील जसेच्यातसे शाबूत असल्याचे नोंदवले आहे. 

या तपासणी पथकाने  सर्वच साखर कारखान्याच्या सर्वच वजन काटे तंतोतंत व बरोबर असून, त्यामध्ये कोणताही फेरफार अथवा दोष नसल्याचा अहवाल दिला आहे. वैद्यमापन पथकाने सर्वच साखर कारखान्यांवर असलेल्या सर्वच वजन काट्याची तपासणी क केली आहे. यापैकी काही साखर कारखान्यांच्या वजन काट्यांमध्ये 20 ते 100 किलोपर्यंत किरकोळ फरक आढळून आल्यानंतर पुन्हा त्या काट्यांची तपासणी असता वजनामध्ये काहीही फरक आढळून आला नाही. त्याप्रमाणे वैद्यमापन सहायक निरीक्षकांनी अहवाल दिलेले आहेत. 

विशेष म्हणजे काही साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करते वेळी शेतकरी संघटनांचेही पदाधिकारी जाणीपूर्वक हजर होते. त्यामुळे या साखर कारखान्यांच्या वजन काट्यांतील निर्दोषत्वाविषयी काही प्रश्‍न शिल्लक नसल्याचे कारखान्याच्या प्रशासनांकडून सांगीतले जात आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात खासगी वजन काटे मोठ्या प्रमाणात आहेत. काही शेतकर्‍यांनी आपला ऊस मोजून नेला असता त्यामध्ये डंपिग ट्रॅक्टरच्या ट्रेलमध्ये 100 ते 200 किलो तर तर मोठ्या चार चाकी ट्रेलमध्ये यापेक्षा अधिक प्रमाणात  वजनात तफावत आढळून आल्याचे सांगितले जाते. 

मात्र, वैद्यमापन पथकांच्या तपासणीत हे वजन काटे निर्दोष ठरले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे शंका निरसन झालेले दिसून येत आहे. आणि साखर कारखाना व्यवस्थापनाकडूनही आपल्या निर्दोषत्वाचे जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात येत असल्याचे दिसते.