Wed, Feb 20, 2019 00:27होमपेज › Solapur › माजी सैनिकांच्या समस्यांबाबत पाठपुरावा करू : कर्नल डिसूजा

माजी सैनिकांच्या समस्यांबाबत पाठपुरावा करू : कर्नल डिसूजा

Published On: Feb 28 2018 11:21PM | Last Updated: Feb 28 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

माजी सैनिक, वीरमाता आणि कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी लष्कर राज्य शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा करेल. त्या समस्या सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे डेप्युटी कमांडिंग ऑफिसर रसेल डिसूजा यांनी दिली.

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्यांबाबत बुधवारी सोलापुरातील  गुजराथी मंगल कार्यालय येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात उपस्थित माजी सैनिकांशी संवाद साधताना कर्नल डिसूजा बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनील गोडबोले, कर्नल अशोक कुमार, मेजर प्रशांत उनियाल, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजिगरे, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या जमीन, पोलिस प्रकरणे, बँक कर्ज, भूसंपादन प्रकरणे, निवृत्तीवेतनविषयक समस्या, पुन्हा रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने असणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात माजी सैनिकांच्या समस्यांबाबत नोंदणी करुन घेण्यात आली. माजी सैनिकांच्या समस्यांबाबतची माहिती संकलित करण्यात आली. 

या माहितीच्या आधारे राज्य तथा केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल, असे कर्नल डिसूजा यांनी सांगितले. सैनिक सेवेत असताना जीवाची बाजी लावून देशसेवा करीत असतात. निवृत्तीनंतर त्यांचे आणि कुटुंबीयांचे जीवन सुकर व्हावे यासाठी लष्कर प्रशासन आता माजी सैनिकांना सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारच्या  मेळाव्यातून सैनिकांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कर्नल डिसूजा यांनी सांगितले.

मेळाव्यास सुमारे हजारहून अधिक माजी सैनिक, युध्द विधवा, वीरमाता यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी कर्नल डिसूजा यांच्या हस्ते माजी सैनिक, वीरमाता, पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. हुतात्मा  मेजर कुणाल गोसावी यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. या मेळाव्यातील विविध स्टॉलवर माजी सैनिकांनी गर्दी केली होती. वैद्यकीय तपासणीसाठी माजी सैनिकांचा ओढा दिसून येत होता.