Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Solapur › उजनीच्या पाणीसाठ्यात घट

उजनीच्या पाणीसाठ्यात घट

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 10:19PMबेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेले, सोलापूर जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाच्या टक्केवारीचा अतिसंथ गतीने वाढत जाणारा काटा सध्या हळूहळू घटत चालला आहे. त्यात उजनी बोगद्यातून 900 क्युसेक, तर कालव्यातून 3000 क्युसेकने पाणी सोडले आहे.

उजनी धरण क्षेत्रात पाऊस नसला, तरी वरील धरणांतून होणार्‍या विसर्गामुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी 34.86 टक्क्यांवर गेलेले उजनी धरण आता माघारी येत पुन्हा 33 टक्क्यांवर आले आहे. सोडलेल्या पाण्याचा फायदा शेतीला होणार आहे; पण उजनी  धरणात पाणी कमी येणे, वाढ संथ होत जाणे आणि पाऊस बंद होणे हे शेतकरी, कारखानादार, कामगारवर्गासाठी चिंता वाढविणारेच आहे. या पाण्यावर जिल्ह्यातील 32 साखर कारखाने आणि या पाण्याद्वारे  जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ 3 लाख 97 हजार 800 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. गतवर्षीपेक्षा उजनी धरणातील पाणीसाठा 7 टक्क्यांनी जास्त असला तरी पाऊस थांबल्यामुळे वाढ होण्यापेक्षा घट होत चालली आहे.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रातही आतापर्यंत केवळ 264 मि.मी. पाऊस पडला आहे. त्यात उजनीवरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रातीलही पाऊस थांबल्यामुळे चिंतेत जास्त भर पडली आहे. काल केवळ  माणिकडोह 2, डिंभे 2, आंध्रा 2, वडिवले 8, पवना 7, मुळशी 10 मि.मी. एवढाच पाऊस पडला आहे.सोलापूर जिल्ह्यातही केवळ 80 ते 85 मि.मी. पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी दोन्ही बाजूने कात्रीत सापडला आहे.

दरवर्षीप्रमाणेच जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहेच. मात्र उजनी धरणातील पाणीपातळीही आता घटत आहे. समाधानाची बाब फक्त एवढीच कि, ‘त्या’ 19 धरणांपैकी 12 धरणे 100 टक्के भरत आली आहेत. तेथे पावसाला सुरुवात झाली तर ते पाणी थेट उजनीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उजनी उजनी धरणातून दौंड येथून 5470 क्युसेकचा विसर्ग येत आहे. उजनी धरण कालव्यातून 3000, तर बोगद्यातून 900 क्युसेक असे 3900 क्युसेकने पाणी जाते. त्यात वारा व वाढत्या उष्णतेमुळे बाष्फीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे येणारे पाणी जाणार्‍या पाण्यापेक्षा जास्त असले तरी उजनीतील पाणी वाढण्यापेक्षा घटत आहे.