Sat, Mar 23, 2019 16:13होमपेज › Solapur › विठ्ठलाच्या 'वॉटर प्रूफ' दर्शन रांगेत ३ कि.मी.चे मॅट(Video)

विठ्ठलाच्या 'वॉटर प्रूफ' दर्शन रांगेत ३ कि.मी.चे मॅट(Video)

Published On: Jul 13 2018 12:32PM | Last Updated: Jul 13 2018 12:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेत येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभरीत्या व्हावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने यंदा वॉटर प्रूफ शेड बरोबरच चिखल होऊ नये म्हणून 3 किमी रांगेत मॅट टाकले आहे. तसेच भाविकांना पिण्यासाठी १५ लाख लिटर आर.ओ.च्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे यंदा वारकऱ्यांना दर्शन रांगेत फारसा त्रास होणार नाही असे दिसून येते.

आषाढी यात्रा ही वर्षातील सर्वात मोठी यात्रा असते. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या १५ लाखांवर जाते. यातील सुमारे ६० टक्के वारकरी रांगेत उभा राहून  दर्शन घेत असतात. मात्र पाऊस, चिखल, ५ ते ६ किलोमीटरच्या रांगेत दिवसरात्र उभा राहणे यामुळे भाविकांना खूप त्रास सहन करावा लागतो. सावळ्या विठ्ठलाच्या १ सेकंदभर दर्शनासाठी तो हा त्रास आनंदाने सहन करीत असतो. यंदा मात्र मंदिर समितीने भाविकांना रांगेत अधिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. विठ्ठल दर्शन रांगेत संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, ४ कायमस्वरूपी पत्रा शेड आहेत. यात्रेपुरते मंदिर समिती दरवर्षी तात्पुरती शेड्स उभा करीत असते. या शेडमध्ये पाऊस आला की चिखल होतो आणि भाविकांना पाऊस, चिखलाचा त्रास होतो. 

यंदा मंदिर समितीने तात्पुरत्या शेडची संख्या वाढवली असून ६ शेड उभे केली आहेत. त्यावर पत्रे टाकून ही शेड वॉटर प्रूफ केली आहेत. आता दर्शन रांगेत एकूण १० शेड उपलब्ध झाली आहेत. तर पुढे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे दर्शन रांग उभी केली आहे. या रांगेत चिखल होऊ नये म्हणून यंदा मंदिर समितीने प्लास्टिकचे मॅट खरेदी केले असून सुमारे तीन किलोमीटर लांबीचे हे मॅट तात्पुरत्या शेडमध्ये टाकण्यात येत आहे. या मॅटमुळे रांगेत चिखल होणार नाही तसेच भाविकांना पायाला मुरूम, कृश खडी टोचनार नाही. पहिल्यांदाच ही सुविधा मंदिर समितीने दिली असून भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रांगेत उभा राहणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून आरओचे पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता मंदिर समितीने स्वतः ३.५० लाख लिटर  आरओच्या पाण्याची खरेदी केली आहे. तर नांदेड येथील सेवाभावी संस्थेने नगरपालिकेच्या बोअरवर आरओ फिल्टर यंत्रणा बसवली असून त्याद्वारे आरओचे पाणी पुरवले जाणार आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरओ प्लॅन्ट मधूनही रांगेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे.

या संदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी संगीतले की, विठ्ठल दर्शन रांगेत सुमारे दीड लाख भाविक एकावेळी उभा राहू शकतील अशी व्यवस्था केली आहे. त्यांना पिण्यासाठी १५ लाख लिटर आरओ पाण्याचे नियोजन केले आहे. पाऊस, चिखल यापासून भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून वॉटर प्रूफ शेड्स, शेडमध्ये २८ हजार चौरस फुटचे मॅट अंथरले जाणार आहे. भाविकांनी शिस्तीत विठ्ठल दर्शन घेऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.