Fri, Jul 19, 2019 22:13होमपेज › Solapur › रेणुकानगरी रहिवाशांचे पाण्यासाठी धरणे

रेणुकानगरी रहिवाशांचे पाण्यासाठी धरणे

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:42PMसोलापूर : प्रतिनिधी

‘एकच मागणी, प्यायला द्या पाणी, स्वस्थ आम्ही बसणार नाही, पाणी घेतल्याशिवाय सोडणार नाही’, अशा घोषणा देत सोलापूर शहराच्या जुळे सोलापूर परिसरातील रेणुकानगरीतील रहिवाशांनी जुळे सोलापूर  नागरी समितीच्या पुढाकारातून पाणी व इतर सुविधांच्या मागणीसाठी मनपासमोर धरणे आंदोलन करीत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले.

‘स्मार्ट  सिटी’च्या गप्पा मारणार्‍या सोलापूर महानगरपालिकेने या नगरीला मागील दहा वर्षांत पाण्यापासून वंचित ठेवले आहे. 600 घरांच्या या वसाहतीला पाणी नाही, जाण्यास मुख्य रस्ता नाही, दिवाबत्ती नाही, कचरा टाकण्याची सोय  नाही, ड्रेनेजलाईन असली तरी त्याला आऊटलेट नाही. यासाठी येथील नागरिकांनी जुळे सोलापूर नागरी हक्‍क समितीच्या पुढाकारातून यापूर्वीही निवेदने दिले, ठिय्या आंदोलन केले. तरी याची दखल घेतली नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

 या नगरीत सिमेंट काँक्रिटच्या चार-चार  भिंती असल्या तरी याची अवस्था सुविधांअभावी झोपडपट्टीपेक्षा निश्‍चितच चांगली नाही. आठ-दहा दिवसांतून एकदा टँकरने पाणी मिळते. पावसाळ्यात चालत जातानासुध्दा कसरत होते. अशा एक ना अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागते म्हणून अनेक घरमालक स्वतःचे घर असूनही  भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. 

वसाहतीतील रहिवासी दरवर्षी महापालिकेला टॅक्स भरतात, पण मोबदल्यात महापालिका काहीच देत नाही. येथील व्होट बँक छोटी असून मतदार संख्या कमी असल्याने लोकप्रतिनिधींचे येथील प्रश्‍नात रस नाही. घरे देऊन बांधून बिल्डर पसार झाला म्हणून येथील नागरिकांची अवस्था ‘आई जेवायला देईना, बाप भिक मागू देईना’, अशी झाली आहे. म्हणून याला महापालिका इतकेच जबाबदार असणार्‍या बिल्डरवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी नागरी हक्क समितीचे अध्यक्ष राजाभाऊ कुसेकर, सूर्यकांत हत्तुरे, वीरभद्र यादवाड, आमसिध्द कोरे, बसवेश्‍वर येळदरे, ताराबाई चव्हाण, सुरेश उटगीकर, राजू मानकर व राजेश जगताप यांनी तीव्र शब्दांत येथील नागरिकांच्या समस्या मांडल्या. 

महापालिका आयुक्त अविनाश ढाकणेे यांनी  निवेदन स्वीकारून तात्काळ पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्याची व कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्याची हमी दिली. 
या धरणे आंदोलनावेळी रेणुकानगरी येथील 500 हून अधिक रहिवासी उपस्थित होते.