Thu, Jul 18, 2019 04:42होमपेज › Solapur › पंढरीत पाणीटंचाई; भाविकांचे हाल

पंढरीत पाणीटंचाई; भाविकांचे हाल

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 28 2018 10:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

एका बाजूला उन्हाचा कडाका वाढत असताना दुसर्‍या बाजूला चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, दर्शन रांगेत भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी चढ्यादराने खरेदी करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे.

सध्या अधिक मासानिमित्त पंढरीत श्री विठ्ठल दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या दररोज वाढू लागली आहे.  या भाविकांना वाढत्या उन्हामुळे पायांना चटके बसत आहेत, तर पाण्याअभावी त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा तोकडा असल्याने चंद्रभागा वाळवंट व दर्शन रांगेत स्कायवॉकवर उभ्या असलेल्या भाविकांना  विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.  

अधिक मास सुरु असल्याने राज्याच्या कानाकोपर्‍यांतून दररोज लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी  अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी  अपेक्षेनुरूप होताना दिसत नाही. चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसरात भाविकांची गर्दी मोठी आहे. मात्र याठिकाणी पिण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थितरित्या करण्यात आला नाही. त्यामुळे मंदिराभोवती सुरु असलेल्या दोन ठिकाणी पाणी पिण्यासाठी भाविकांची तारांबळ उडत आहेत. 

चंद्रभागा वाळवंटात भाविकांसाठी नळपाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नळाला पाणी नसल्याने भाविकांची कुचंबणा होत आहे. दर्शन रांगेत सारडा भवन येथे दोन ठिकाणी मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी शुध्द पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु स्कायवॉकवर उभ्या असलेल्या भाविकांना मंदिर समितीच्यावतीने पाणीपुरवठा केला जात नसल्याने या भाविकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. 

मंदिर समितीच्यावतीने करण्यात आलेले नियोजन फसल्याने भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दर्शन रांगेत उभे असल्याने भाविक मधून बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पाण्याची बाटली वीस रुपये देऊन विकत घ्यावी लागत आहे. दर्शन रांग व मंदिर परिसर याठिकाणी उभारण्यात आलेल्या शेडनेटचाच एकमेव आधार भाविकांना मिळत आहे. अधिक मासानिमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  पंढरपूर नगरपालिका आणि मंदिर समितीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.