Wed, Apr 24, 2019 07:39होमपेज › Solapur › वीर धरणातून विसर्गात वाढ

वीर धरणातून विसर्गात वाढ

Published On: Jul 23 2018 10:36AM | Last Updated: Jul 23 2018 10:36AMबोंडले : विजयकुमार देशमुख 

नीरा खोर्‍यात सुरू असलेल्या पावसामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा देवधर या धरणामधील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात धरणात येणार्‍या पाण्याची आवक वाढल्यामुळे वीर धरणामधून निरा नदीत रविवारी मध्यरात्री १२.३० वाजलेपासून वाढ करण्यात आली असून १३ हजार ७७२ क्युसेस विसर्ग नीरा नदीपात्रात सोडला जात आहे.

आज दि.२३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता वीर धरणमधील पाणी साठा ९७.११% एवढा होता. तसेच धरणामध्ये येणार्‍या पाण्याची आवक चांगली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काल रविवारी दु.४ वा. ४ हजार ५६३ क्युसेस विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात आला होता. यात रविवारी रात्री १२.३० वाजता वाढ करण्यात आली असून धरणाचे ३ दरवाजे ४ फुटाने उचलण्यात आलेले आहेत व यातून १३ हजार ७७२ क्युसेस वेगाने पाणी निरा नदीत सोडले जात आहे.

वीर धरणामधून सध्या उजवा कालव्यांद्वारे १५५० क्युसेस तर डाव्या कालव्यामधून ८२७ क्युसेस व नीरा नदी पात्रात १३ हजार ७७२ क्युसेस विसर्ग असा एकूण १६ हजार १४९ विसर्ग धरणामधून सुरु आहे.
नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा देवधर आणि वीर या तीन धरणात आज रोजी ३६.२४ टीएमसी एवढा उपयुक्त पाणी झालेला आहे तर तीन धरणाची सरासरी टक्केवारी ८३.८१ टक्‍के एवढी झालेली आहे.
सोमवार दि.२३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता या तीन धरणामधील पाणीसाठा अनुक्रमे भाटघर ७६.५८% (१७.९९ टीएमसी), निरा - देवधर ७७.७६% (९.१२ टीएमसी) व वीर ९७.११ % (९.१३ टीएमसी) एवढा झालेला होता.