Fri, Apr 26, 2019 09:26होमपेज › Solapur › जलसंकटाचे सावट!

जलसंकटाचे सावट!

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:18PMसोलापूर : प्रतिनिधी

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या औज बंधार्‍याचा जलसाठा शून्यावर असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या गंभीर बाबीसंदर्भात महापालिकेचे प्रशासन व पदाधिकारी बेफिकीर असून तहान लागल्यावर  विहीर  खोदण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. 

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत असल्याबाबत शिवसेनेने 4 मे रोजीच्या सभेत लक्षवेधी मांडली होती. शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याचे धोरण  असताना   शहराच्या  अनेक भागांत चार ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे शिवसेनेने निदर्शनास आणून दिले होते. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा हा नमुना असल्याची टीकाही शिवसेनेने केली होती. या पार्श्‍वभूमीवर शिवसेेनेचे नगसेवक देवेंद्र कोठे, विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, अमोल शिंदे, भारतसिंग बडूरवाले, उमेश गायकवाड आदींनी शुक्रवारी औज बंधार्‍याला टाकळी येथे भेट दिली असता औज बंधार्‍याची पातळी शून्यावर आल्याचे दिसून आले.

याबाबत पत्रकारांशी बोलताना कोठे म्हणाले, उजनी धरणात जलसाठा पुरेशा प्रमाणात असूनही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे; मात्र प्रशासन ते करीत नाही. औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी जॅकवेलची लेव्हल 8 फूट 4 इंच इतकी असल्याचे आज आमच्या पाहणीवेळी दिसून आले. हे पाणी साधारणपणे 15 दिवस पुरणार आहे. मात्र उजनीतून पाणी सोडण्यास विलंब झाल्यास ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने आवश्यक पत्रव्यवहार व पदाधिकार्‍यांनी शासन दरबारी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

औज बंधार्‍याचा जलसाठा शून्यावर आला, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा सवाल निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजप पाण्यासंदर्भात दरवेळी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार करतात, ही चुकीची बाब आहे. स्थानिक  दोन मंत्र्यांचे पाणीप्रश्‍नी दुर्लक्ष असून त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून उजनीतून तातडीने पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करणे अपेेक्षित आहे. 

कर्नाटकच्या शेतकर्‍यांकडून पाण्याची चोरी

बंधार्‍याकडे जाणार्‍या रस्त्याच्या खालून बेकायदेशीरपणे पाईपलाईन करुन कर्नाटकच्या शेतकर्‍यांकडून पाणी चोरी होत आहे. याबाबत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक शिंदे यांनी यावेळी केली. 

16 दिवस पुरेल इतके पाणी

पाण्याच्या स्थितीबाबत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उस्तुरगे यांना विचारले असता ते म्हणाले, गतवेळी उजनीतून 25 मार्चला सोडलेले पाणी 3 एप्रिल रोजी औजमध्ये पोहोचले. साधारणपणे बंधार्‍याचे पाणी 55 दिवस शहराला पुरते. टाकळी येथे 8 फूट 4 इंच इतकी लेव्हल असून हे पाणी आगामी 16 दिवस पुरणार आहे. औजमध्ये जलसाठा संपल्याने पाणी सोडण्याचे मागणी पत्र प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाला देण्यात आल्याचेही उस्तुुरगे यांनी यावेळी स्पष्ट केले.