Mon, May 20, 2019 11:09होमपेज › Solapur › नळ-ड्रेनेज जोडणी आता ऑनलाईन

नळ-ड्रेनेज जोडणी आता ऑनलाईन

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 10:31PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेकडून यापुढे नळ-ड्रेनेज जोडणी आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

नळ वा ड्रेनेज जोडणीचे काम झोन कार्यालयाकडून केले जाते. मनपाकडे याबाबत आवश्यक यंत्रणा नसल्याने परवानाधारक प्लंबरकडून नळ-ड्रेनेज जोडणीचे काम करवून घेण्यात येते. पण हे करीत असताना रीतसर पावतीच्या रकमेपेक्षा जादा रक्‍कम मिळकतदारांकडून वसूल केली जाते.  याद्वारे मिळकतदारांची एकप्रकारे लूट होते. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याबाबत आयुक्‍तांचे लक्ष वेधले असता त्यांनी  यापुढे नळ-ड्रेनेज जोडणीचे काम ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल, असे सांगितले. मिळकतदारांनी नळ-ड्रेनेज जोडणी  ऑनलाईन अर्ज करावा. पुढील सोपस्कर झाल्यानंतर भरलेल्या रकमेची पावती ही झोन कार्यालयाला दाखवून जोडणीचे काम करून घ्यावे. जादा पैशाची मागणी कोणी केल्यास देऊ नये. एखादा प्लंबर जर जादा पैशाची मागणी करीत असेल तर मनपाकडे तक्रार करावी. अशा प्लंबरचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्‍तांनी सांगितले. 

...तर विक्रेत्यांनी धंदा बंद करावा

70 फूट रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी चिप्पा मार्केटमध्ये बसण्यास नकार दिला आहे. चिप्पा मार्केटऐवजी पर्यायी जागेची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता आयुक्‍त 
म्हणाले, मनपाने सर्वसोयींनी चिप्पा मार्केट सज्ज केले आहे. या मार्केटमध्ये बसण्यासाठी विक्रेत्यांना दोनदा अवधी दिला. मात्र ते जर आता नकार देत असतील तर मनपाला कारवाई करावी लागेल. चिप्पा मार्केटमध्ये बसायची तयारी नसेल तर विक्रेत्यांनी आपला धंदा बंद करावा, असेही आयुक्‍तांनी ठणकावून सांगितले. उजनी येथे खबरदारीचा उपाय म्हणून मनपा दुबार पंपिंगची व्यवस्था करीत आहे. पाऊस चांगला झाल्यास दुबार पंपिंगचा प्रश्‍न येणार नाही. मात्र पाऊस न झाल्यास पाण्याची पातळी खालावल्यास दुबार पंपिंगची यंत्रणा तयार ठेवावी लागणार आहे. त्यादृष्टीने निविदा मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.