Sat, Nov 17, 2018 02:20होमपेज › Solapur › आषाढी यात्रेवर 84 कॅमेर्‍यांची नजर

आषाढी यात्रेवर 84 कॅमेर्‍यांची नजर

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:53PMपंढरपूर : अरूण बाबर 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या विठुरायाची आषाढी एकादशी सोहळा आज ( दि. 23 जुलै ) असल्याने शहरात सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आहेत.सुमारे 10 लाख भाविकांना व वारक-यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून यंत्रणा हायटेक केली आहे. शहरातील विविध हालचालींवर शहर पोलीस ठाणे आणि विठ्ठल मंदिरातील सी.सी.टी.व्ही.द्वारे  नियंत्रण ठेवले जात असून एकंदरीत 84  कॅमेर्‍यांची नजर संपूर्ण यात्रेवर असल्याचे दिसून येते. 

आषाढी यात्रेनिमित्त  होणार्‍या प्रचंड गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी   शहरातील  प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, रेल्वे स्थानक, पंढरपूर बसस्थानक यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पोलिस, मंदिर समिती व पंढरपूर बसस्थाक यांच्या संयुक्तपणे अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेची मदत घेऊन शहरातील विविध भागातील गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पंढरपूर शहरातील प्रमुख रस्त्यावर पोलिसांचे 6 कॅमेरे आहेत. पंढरपूर बस स्थानकात 16 आणि यात्रेपुरते नवीन चार बसस्थानकांवर 16 कॅमेरे आहेत. पालखी तळावर मोबाईल व फोनसारख्या संपर्क यंत्रणांवर विसंबून न राहता हँम रेडिओचा वापर करण्यात येत आहे. तर मंदिरात 58 व दर्शन रांगेसाठी 26 ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. तर यात्रेत गर्दीच्या ठिकाणी मोठे  15 एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत.यात्रेनिमित्त  17 जुलै ते  28 जुलै या कालावधीत यात्रेत घडणार्‍या सर्व घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या व्यवस्थेच्या संदर्भात शहर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले की, गर्दीच्या काळात अशा व्यवस्थेचा पोलिस बंदोबस्तासाठी मोठा फायदा होत आहे. या व्यवस्थेसाठी जाणकार तंत्रज्ञांची नेमणूक केली आहे.