Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Solapur › आढीव जि.प.शाळेत कचर्‍याची होळी

आढीव जि.प.शाळेत कचर्‍याची होळी

Published On: Mar 02 2018 12:50AM | Last Updated: Mar 01 2018 10:58PMपंढरपूर : प्रतिनिधी

ग्रामस्वच्छतेतून गोळा  झालेल्या केर आणि कचर्‍याची अनोखी होळी आढीव (ता. पंढरपूर) येथील जि. प. शाळेत मोठ्या उत्साहात साजरी झाली. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षक प्रशांत वाघमारे यांच्या संकल्पनेतून सलग 22 व्या वर्षी अशा प्रकारची कचर्‍याची होळी साजरी केली जात आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त बुधवारी जि. प. शाळेतील  विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता करून गावातील केरकचरा गोळा केला. त्यातील प्लास्टिकचे कागद खड्ड्यात गाडून टाकले व कोणताही लाकूडफाटा, गोवर्‍या न जाळता कचर्‍याची होळी केली. या होळीची राख खत निर्मितीसाठी नंतर वापरली जाणार आहे. 

यावेळी शिक्षक प्रशांत वाघमारे यांनी होळीची संकल्पना समजावून सांगितली. पर्यावरणपूरक असणारा लाकूडफाटा व गोवर्‍या न जाळण्याची शपथ पल्लवी यलमर, अश्‍विनी तावसकर यांनी दिली. वृक्षसंवर्धनाचे  महत्त्व संकेत जाधव, रंजना लिमकर यांनी सांगितले. तर पाण्याच्या वापराचे महत्त्व, जलसाक्षरतेचे महत्त्व जयवंत चव्हाण, शोभा महामुनी यांनी सांगितले. होळीत पुरणपोळी न टाकण्याचेही आवाहन यावेळी आरती थोरात, नंदकुमार वसेकर यांनी केले.

व्यसनमुक्‍तीची शपथ आदित्य बरडे, शहाजी ढेरे यांनी दिली. वातावरणातील बदलाची माहिती अनुराधा कुलकर्णी, विष्णू नरळे, आवेश करकमकर, संगीता वसेकर यांनी दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकाच्या घरी केरकचर्‍याचीच होळी करण्याचा संकल्प केला. यावेळी सरपंच एकनाथ चव्हाण, अध्यक्ष नितीन चव्हाण, मुख्याध्यापक रवींद्र भालेराव, गणेश पवार, सोमनाथ घोगरे, नानासाहेब शिनगारे, योगेश गोरे, धनाजी वसेकर, विलास कांबळे, महादेव पवार, दादा सुरवसे, सुरेश चव्हाण, अफसर मुलाणी व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. या आधुनिक होळीसाठी पं. स. सदस्य राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अतुल खरात, गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, विस्तार अधिकारी पोपट लवटे, केंद्रप्रमुख डॉ. नामदेव भोसले यांनी मार्गदर्शन केले.