होमपेज › Solapur › नवमतदारांना घरबसल्या मिळणार ओळखपत्र

नवमतदारांना घरबसल्या मिळणार ओळखपत्र

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 8:50PMसोलापूर : महेश पांढरे

येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या ज्या नवमतदारांना आपली नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट करायची आहेत, त्यांना राष्ट्रीय मतदार सर्व्हिस पोर्टलवरुन घरबसल्या मतदार यादीत नाव नोंदविण्याची आणि मतदान कार्ड मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवमतदारांची संख्या वाढावी तसेच सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी ईआरओ नेट प्रणाली शासनाच्या निवडणूक विभागाने विकसित केली आहे. या निवडणूक प्रणालीमध्ये राष्ट्रीय मतदार सर्व्हिस पोर्टलच्या माध्यमातून नवमतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी तसेच नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व्हिस पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज दाखल करुन मतदार यादीत नावही समाविष्ट करता येणार आहे. 

तसेच मतदान ओळखपत्रही मिळविता येणार आहे. त्यामुळे नवमतदारांनी या यंत्रणेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणीसाठीची संख्या कमी दिसून येत असून 18 ते 19 वयोगटातील  प्रत्यक्ष मतदारांची संख्या दीड लाखांच्या वरती असताना नोंदणीमात्र 40 ते 50 हजार एवढीच आहे. त्यामुळे नवमतदारांनी या प्रणालीचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.